ज्येष्ठ नेते गोिवदराव पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाड याला अंडा बराक मधून बाहेर काढावे, अशी मागणी समीरच्या वकिलांनी मंगळवारी येथील न्यायालयात सादर केली. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.डी.बीले यांनी कारागृह अधीक्षकांचे मत मागविले आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार (दि.२३) होणार आहे.
पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणावरुन समीरला न्यायालयात हजर करु शकत नाही, यामुळे यापुढील सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी मागणी केली. यावर समीरचे वकील एस. यु. पटवर्धन यांनी आक्षेप घेतला. समीरला सुरक्षा पुरविण्याचे काम पोलिसांचे आहे. सुनावणीवेळी काय घडते, खटल्यामध्ये काय सुरु आहे, हे जाणून घेण्याचा समीरला अधिकार आहे. यामुळे या अधिकारांची पायमल्ली पोलीस या अर्जाद्वारे करत असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीश बिले यांनी ज्या वेळी न्यायालयात समीरची उपस्थिती आवश्यक असेल त्या वेळी त्याला बोलाविले जाईल असे आदेश दिले.
सुनावणीपूर्वी आपण समीरला भेटलो.अंडा बराकमधून बाहेर काढल्यानंतर कोणाशी बोलू दिले जात नाही, यामुळे आपली मानसिक परिस्थिती ढासळत असून याबाबतचा अर्ज त्याने दिला असल्याचे पटवर्धन यांनी न्यायालयात सांगितले. समीरला नियमित सेलमध्ये ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली. यावर अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी आक्षेप घेत समीरच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावर पटवर्धन यांनी ९० दिवसच अंडासेलमध्ये आरोपीस ठेवता येते मात्र समीर गेल्या साडेचार महिन्यापासून याठिकाणी आहे. यामुळे समीर मानसिक रोगी होत असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीश बिले यांनी कारागृह अधीक्षकांचे मत मागवून निर्णय घेण्यात येईल असे आदेश दिले.
समीरचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे समीरवर चार्ज फ्रेम करावे व खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी न्यायालयाकडे केली. यावर सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी आक्षेप घेत एकीकडे पानसरे हत्येचा खटला जिल्ह्याबाहेर चालवावा अशी मागणी उच्च न्यायालयात समीरच्या वकीलांनी केली आहे. तर, समीरवर आरोप निश्चित करा अशी मागणी समीरचे वकील करत आहेत हे चुकीचे आहे. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आदेश दिले.