आझाद चौक येथील कॉमर्स कॉलेज समोरील रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिणा-यांवर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाच्या वतीने सोमवारी करण्यात आली. दरम्यान परिसरात मोठय़ा प्रमाणात कार्यकत्रे जमल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते.
कॉमर्स कॉलेज बाहेरील रस्त्यावर ‘हॅप्पी बर्थ डे एसआयएस-५’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. हा मजकूर दहशतवादी संघटना आयसीस यांच्याशी संबंधित असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना काही नागरिकांनी दिली. यामुळे संघटनेचे कार्यकत्रे आझाद चौक परिसरात दाखल झाले. दरम्यान रस्ता हा सार्वजनिक बाब असून असा मजकूर लिहिणे आक्षेपार्ह आहे. हा मजकूर आयसीसशी संबंधित आहे काय, याची शहानिशा पोलिसांनी करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या महेश उरसाल व बंडा साळोखे यांनी केली.
दरम्यान आझाद चौक परिसरात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणीही पोलिसांनी हद्दीचा वाद घालत घटनास्थळावर दाखल होण्यास विलंब केला.
पोलीस चौकी अडकली उद्घाटनात
आझाद चौक येथे पोलीस चौकी होती. काही वर्षांपूर्वी ही चौकी बंद करण्यात आली होती. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी यांच्या आदेशाने या चौकीचे नूतनीकरण केले. मात्र गेल्या ४ महिन्यांपासून उद्घाटन न झाल्याने ही चौकी बंद आहे.