भोगावती नदीवरील पाणी उपसाबंदी त्वरित उठवावी; अन्यथा पाटबंधारे खात्याला टाळे ठोकण्याचा निर्णय बहिरेश्वर (ता. करवीर) गावच्या आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदा बचाटे होते.
जिल्ह्यात पाणी उपसाबंदी अन्यत्र नाही. मग पाटबंधारे खात्याने भोगावती नदीपात्रात अन्यायी पाणी उपसाबंदी सुरू केल्यामुळे करवीर पश्चिम भागात ऊस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस पिके करपून गेल्याने पाटबंधारे खात्याने सरकारी पाणीपट्टी या वर्षी रद्द करावी. पन्हाळा तालुक्यात पाणी उपसा परवाना चालू आहेत; पण करवीर तालुक्यात पाणीटंचाईचे कारण पुढे करून उपसाबंदी लादली गेली. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
भोगावती नदीवरील पाणी उपसाबंदी त्वरित रद्द करावी. उद्योगधंद्यांना पाणीपुरवठा कमी करून शेतीला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. शेतीला उन्हाळ्यात पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी गाववार संपर्क मेळावे घेण्याचाही निर्णय झाला. या वेळी करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, माजी सरपंच आनंद बचाटे आदींनी मनोगत व्यक्त केले.