शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने २०१४-१५ सालच्या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन २५०० रुपयेप्रमाणे रक्कम अदा केली आहे. मार्च ते गळीत हंगाम पूर्ण होईपर्यंत आलेल्या उसाला उर्वरित १३०० रुपयांचा हप्ता शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, श्री दत्त साखर कारखान्याने २०१४-१५च्या हंगामामध्ये १६ मार्च ते गळीत हंगाम अखेरपर्यंत आलेल्या उसास १२०० रुपयांप्रमाणे अ‍ॅडव्हान्स दिला होता. १६ मार्चनंतर आलेल्या उसाला प्रतिटनास १३०० रुपयेप्रमाणे रक्कम सोमवारी ऊस पुरवठादारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. साखरेचे दर कमी झाल्याने ऊसबिलाची रक्कम अदा करावयाची राहिली होती. केंद्र शासनाने साखर कारखान्यांसमोरील ही समस्या विचारात घेऊन एफआरपीप्रमाणे ऊसदर देण्यासाठी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कारखान्यास बँक ऑफ इंडियाकडून कर्ज उपलब्ध झाल्याचे सांगून ते म्हणाले, अखेरीस आलेल्या एकूण २ लाख ४४ हजार ५९ मेट्रिक टन उसाची ३१ कोटी ७२ लाख ७७ हजार रुपये इतकी रक्कम द्यावयाची राहिली होती. ती रक्कम बँक ऑफ इंडियाच्या जयसिंगपूर शाखेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
कारखान्याने गळीत हंगाम २०१४-१५ मध्ये गळीत केलेल्या १२ लाख १० हजार २२५ टनावर प्रतिटनास २५०० प्रमाणे एकूण ३०२ कोटी ५५ लाख रुपये आजअखेर अदा केलेली आहे. दुष्काळी परिस्थिती असताना शेतक-यांना अशा परिस्थितीत पैशाची नितांत गरज आहे. ऊसबिले प्राप्त झाल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे. या वेळी उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, बी. बी. शिंदे यांच्यासह संचालक उपस्थित होते.