दयानंद लिपारे, कोल्हापूर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले, तरी कोल्हापुरात मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्य़ात दारुण पराभव झाल्यानंतरही हे कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने पक्ष नेतृत्वाने याकडे लक्ष देण्याची शिवसैनिकांची मागणी आहे.

माजी  आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी आपल्या समर्थकांना पुढे करून कुरघोडीचे राजकारण सुरू केले आहे. आधीच विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील शिवसेनेची रया गेली असताना हे दोन्ही प्रमुख नेते एकमेकांवर कुरघोडय़ा करण्यात गुंतल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्ह्य़ातील दोन्ही खासदार निवडून आल्यानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास बळावला होता. आठ आमदार निवडून आणण्याची घोषणा करूनही सहा ऐवजी एकच आमदार निवडून आल्याने शिवसेनेची खचलेली ताकद दिसली. पराभूतांमध्ये कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर यांचा समावेश होता. ‘शरद पवार यांच्यामुळे पराभव झाला’ अशी प्रतिक्रिया त्या वेळी त्यांनी दिली होती. मात्र, निकाल लागून महिना उलटल्यानंतर आता त्यांचे समर्थक, शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी ‘क्षीरसागर यांच्या पराभवाला गद्दार जिल्हाप्रमुख संजय पवार कारणीभूत असल्याने त्यांची हकालपट्टी करावी’ अशी मागणी करीत आहेत. तर ‘आमदारकी जाण्यास स्वत: क्षीरसागर आणि इंगवले हेच कारणीभूत असून त्यांनी इतरांवर पराभवाचे खापर फोडू नये’, असा प्रतिटोला पवार समर्थकांनी लगावला आहे. एकीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला असतानाच कोल्हापूर जिल्ह्य़ात मात्र कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.