News Flash

साडेपंधरा लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्जमाफीची योजना नियोजनबद्ध सुरू आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास मुक्त संवाद कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. सोबत वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष विनय कोरे.

राज्य शासनाने कृषी कर्जमाफीची घोषणा न करता कृतिशील अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत १५ लाख ४२ हजार शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केली.

पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअिरग कॉलेजच्या पटांगणावर श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘दिलखुलास मुक्त संवाद’ कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

राज्यशासन कर्जमाफीच्या मुद्दावरून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी उत्तर देत कर्जमाफीची योजना नियोजनबद्ध कशी सुरू आहे याचा सविस्तर आढावा पहिल्याच प्रश्नावेळी घेतला. कर्जमाफी म्हणजे आजारी असलेल्यांना औषध आहे. तो नियमित देण्याचा डोस नव्हे, अशा शब्दात फडणवीस यांनी कर्जमाफीमागील राज्य शासनाच्या भूमिकेची उकल केली. ते म्हणाले, की पुढील दोन टप्प्यात प्रत्येकी १० लाख अशा आणखी २० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. येत्या पंधरवडय़ात सर्व शेतकरी कर्जमाफीच्या लाभ योजनेत समाविष्ट होतील.

कोल्हापूरचा पर्यटन आराखडा तयार

कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार केला आहे. अंबाबाई मंदिराचा ८० कोटींचा आराखडा बनवला आहे. कोल्हापूर पाहिल्यानंतर जिल्ह्यातील अन्य स्थळांना पर्यटकांनी भेट द्यावी, असे पर्यटनाचे वर्तुळ तयार करण्याचा शासनाचा मानस असल्याचे फडणवीस यांनी नमूद करत कोल्हापूरसाठी शासन बरेच काही करत असल्याचे दाखवून दिले. नाभिक समाजाबद्दलच्या ‘त्या’ विधानाबद्दल फडणवीस म्हणाले, माफी मागूनही कोणी राजकारण करत असेल तर ते योग्य नव्हे.

गुरुजींचीच घेतली हजेरी

शिक्षकांच्या बदलीच्या मुद्दय़ावर फडणवीस यांनी गुरुजींचीच हजेरी घेतली. ते म्हणाले, सलग १५ वर्ष एकाच दुर्गम भागातील शिक्षकांना सुगम भागात यावे वाटले तर त्यात गर नाही. अनेक वर्ष सुगम भागात शिकवणाऱ्या शिक्षकांनी दुर्गम भागाचा अनुभव घ्यावा. मात्र, या बदल्या शिक्षक संघटनेला विश्वासात घेऊन केल्या जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2017 1:07 am

Web Title: devendra fadnavis comment on loan waiver to maharashtra
Next Stories
1 शरद पवार – मुख्यमंत्री भेटीवर उद्धव यांची टीका
2 दौऱ्यांची वेळ एकच, आव्हाने वेगळी
3 ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांची पिळवणूक – सतेज पाटील
Just Now!
X