24 January 2020

News Flash

देशभरातून मदत मिळवून पूरग्रस्तांना वाचवणार

पडलेल्या घरांकरिता आणि अन्यधान्यासाठीही राज्य सरकार मदत करत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली मधील महापुराच्या आपत्तीला शासन योग्यप्रकारे मदत करीत आहे. देशात मिळेल तेथून यंत्रणा उपलब्ध करून पूरग्रस्तांना संकटातून बाहेर काढले जाईल, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ही वेळ पूरग्रस्तांना मदत करण्याची असून राजकीय कुरघोडी , संभाषण करण्याची वेळ नाही, असा टोला त्यांनी यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना लगावला.

पश्चिम महाराष्ट्रात महापुराने हाहाकार उडवला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात पोहोचले आहेत. त्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,की दोन महिन्यात पडणारा पाऊ स सात दिवसात पडला असल्याने महापुराची स्थिती उद्भवली आहे. वेगवेगळ्या धरणातल्या विसर्गामुळे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांची मदत आपण घेतली. ओदिशा, पंजाब, गोवा आणि राज्यातील पथके या ठिकाणी बचावकार्यात सहभागी झाली आहेत. सांगलीतील स्थिती सर्वाधिक भीषण असून काही भाग सोडला तर संपूर्ण शहर पाण्याखाली आहे. कालपर्यंत ११ पथके तेथे बचावकार्यात सहभागी होती. आज नौदल, एनडीआरएफची अतिरिक्त पथके त्या ठिकाणी पोहोचली आहेत, तर काही पथके केंद्राकडूनही येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ब्रह्मनाळ येथे लोकांना सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने बोट सोडली होती. त्या बोटीत ३०—३५ जण बसले होते. परंतु त्या बोटीच्या इंजिनमध्ये फांदी गेल्याने ती बोट उलटली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्या ठिकाणी आता बोटी वाढवल्या आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ  नये. पूर परिस्थिती असलेल्या ठिकाणी एअरलिफ्टिंगही करणार असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील २२३ गावे  पुरामुळे बाधित झाली आहेत. तर १८ गावांना पूर्णपणे पाण्याने वेढले आहे. १५२ ठिकाणी ३८ हजार लोक शिबिरांमध्ये असून काही ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना राज्य सरकार मदत करणार आहे. पडलेल्या घरांकरिता आणि अन्यधान्यासाठीही राज्य सरकार मदत करत आहे. पूर परिस्थितीमुळे २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. तो कसा चालू करता येईल यावरही विचार सुरू आहे. आवश्यक औषधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास हवाई मार्गाने औषधे पुरवली जाणार आहेत. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सध्या पेट्रोल डिझेलची टंचाई आहे. बचाव कार्यासाठी प्रामुख्याने ते कसे पोहोचवता येईल यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत

पुरामुळे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाखांची मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एकंदरीत पूरपरिस्थिती पाहता कर्नाटक सरकारनेही अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आवश्यक ती मदत पुरवणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

First Published on August 9, 2019 4:05 am

Web Title: devendra fadnavis meet flood victims promise for all help zws70
Next Stories
1 गावठी बंदुका विकणारा अटकेत
2 महानगरांचा दूध, भाजीपाला पुरवठा ठप्प
3 पुणे-बेंगळुरू महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद
Just Now!
X