दयानंद लिपारे

राज्यातील साखरेच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही साखर उत्पादकांच्या बाजूने निर्णय घेण्यास भाग पाडणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शह देण्यासाठीच होती, असाच सूर उमटला आहे. यामुळे साखरपट्टय़ात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, असा संघर्ष पुढील काळात बघायला मिळेल, अशीच शक्यता दिसते.

देशातील साखर उद्योगांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची २० हजार कोटींहून अधिक एफआरपी थकीत आहे. ऊस वाहतूक, तोडणी, कामगार पगार, व्यापारी देणी प्रलंबित आहेत. शिवाय कर्जाचा मोठा बोजा असल्याने व्याज व हप्ते याची चिंता निर्माण झाली आहे. या बाबी गंभीर असल्याने साखर उद्योगाला केंद्र शासनाकडून आणखी एखादे पॅकेज मिळवण्याच्या उद्देशाने फडणवीस यांनी दिल्ली वारी केली. त्यांनी भाजपच्या साखर कारखानदारांना सोबत घेऊन केंद्र शासनाच्या साखर उद्योग उपसमितीचे प्रमुख अमित शहा, नरेंद्र सिंग तोमर, रामविलास पासवान आदी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन साखर उद्योगातील प्रश्नांचा पाठपुरावा केला. मात्र त्यांच्या या कृतीला राजकीय आयाम दिला जात आहे.

साखर उद्योगासमोर आव्हाने

साखर उद्योगातील आर्थिक प्रश्न ऐरणीवर आल्याने त्याची गांभीर्याने नोंद घेण्याची गरज असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जाते. भाजपच्या साखर महाराष्ट्रातील साखर उद्योग विभाग आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, ‘यंदा उसाचे विक्रमी उत्पन्न झाले असल्याने गाळपाचे आव्हान साखर उद्योगासमोर आहे. आर्थिक पातळीवर अडचणीत असलेल्या साखर उद्योगाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे. राजकारणाच्या पलीकडे त्याचा विचार झाला पाहिजे ही भावना घेऊनच फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. शरद पवार असे प्रयत्न करीत असतात, तसेच फडणवीस यांनी प्रयत्न केले तर त्यात गैर काही नाही’.

साखर कारखाने अडचणीत आल्याने त्यांना आर्थिक मदत केंद्र शासनाकडून मिळवून देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कितपत साध्य होणार हे पाहावे लागेल. पण साखर उद्योगातील शरद पवार यांचा मुळातून अभ्यास आहे. त्यामुळे त्यांचे स्थान निर्विवाद असून त्याला कोणी धक्का लावू शकत नाही असे राष्ट्रवादीचे नेते, ग्राम्विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पवार यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक

महाराष्ट्रातील साखर उद्योगावर शरद पवार यांचे प्रभुत्व आहे. कोणत्याही पक्षातील साखर कारखानदार हे उद्योगातील अडचणी आल्या की त्याचे गाऱ्हाणे पवारांकडे मांडत असतात. साखर उद्योगाचे प्रश्न धसास लावण्यासाठी पवार यांनी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापूर्वीही तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यातून साखर उद्योगाला अनेक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामुळे त्या त्या वेळी साखर उद्योगातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत झाली. यातून पवार यांचे राज्यातील साखर उद्योगावर एकहाती वर्चस्व निर्माण झाले आहे. त्याला शह देण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेल्याची चर्चा आहे.