माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना त्यांचे अवमुल्यन करणारा मजकूर वापरल्याने बुधवारी कोल्हापुरात शाहूप्रेमी नागरिक, राजकीय पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात आला. फडणवीसांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. टीकेचा मारा सुरु झाल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा ट्विट करून शाहू महाराजांच्या कार्याची थोरवी व्यक्त करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला.

आज ६ मे रोजी राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. यामध्ये त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. यातील ‘कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेत शाहूप्रेमी नागरिकांनी फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पोवार, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नवीद मुश्रीफ, आदिल फरास, अनिल साळोखे यांनी फडणवीस यांचा याप्रकरणी निषेध व्यक्त करीत माफी मागण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज कळले नाहीत. राजर्षी शाहू महाराज हे ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख ‘कार्यकर्ते’ असा एकेरी होणे हा अवमान असून शाहूप्रेमी जनता हे कदापीही सहन करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले, “फडणवीस यांच्यासारख्या चाणाक्ष नेतृत्वाने शाहुराजांचे केलेले अवमूल्यन संतापजनक आहे.” अशा प्रकारे अनेक टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

फडणवीसांकडून सुधारणा

टीकेचा सूर वाढू लागल्यानंतर फडणवीस यांनी दुपारी आणखी एक ट्विट करून शाहू महाराजांच्या कार्याची महती व्यक्त करणाऱ्या त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये ‘सामाजिक क्रांतीचे जनक, वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन’, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.