‘दख्खनचा राजा’ जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार असल्याने जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) येथे भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाणी टंचाई तीव्र असल्याने ‘पाणी वाचवा’ अभियान राबविण्यात येणार आहे.  कोल्हापूर महानगरपालिकेकडून पंचगंगा नदीघाट परिसर येथे सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील  सुमारे ७ लाख भाविक कुलदैवत दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे.
जोतिबा डोंगरावर बेळगावची मानाची सासनकाठी चांदीची मूर्ती, नंदीकाठीच्या लवाजम्यासह दाखल झाली. सोलापूर ते जोतिबा डोंगर पायी दंडवत घालत आलेल्या उद्धव कोरे या भाविकाचे आगमन जोतिबा मंदिरात झाले. या चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर सुमारे सात लाखांहून अधिक भाविक जोतिबाचे दर्शन घेतात. प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीघाटावर एसटी महामंडळाने निवारा शेड उभारले आहे. मंगळवारपासून पंचगंगा घाटावरून भाविकांसाठी एसटी बसेसची विशेष सोय केली आहे, तसेच मध्यवर्ती बसस्थानक, जोतिबा बसस्थानकातून पाच मिनिटाला बसेस सुटणार आहे. ‘चांगभलं’च्या गजरात सासनकाठय़ा, भगवे झेंडे घेऊन भाविक खासगी वाहनांतून येत आहेत .
बुधवारी सासनकाठी मिरवणुकीतील मानाच्या सासनकाठय़ा दाखल होतील. कोल्हापूर जिल्हा टू-व्हिलर मॅकेनिक असोसिएशनची बठक होऊन ‘पाणी वाचवा’ अभियान राबविण्यात येणार असून तहानलेल्या भाविकांसाठी मार्गावरच पिण्यासाठी पिण्याच्या बाटल्या पुरवण्याचा निर्णय झाला .तसेच  कोल्हापूर ते जोतिबा ते वारणा या मार्गावर नऊ ठिकाणी टू-व्हिलर दुरुस्ती, पंक्चर, मॅकेनिक अशा ७० जणांच्या पथकाची सोय केली आहे. त्यातून मोफत सेवा देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान धर्तीवर राज्यामध्ये राबविणेत येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत श्री जोतिबा चत्र यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिकेकडून पंचगंगा नदीघाट परिसर येथे सोमवारी आरोग्य विभागाचेवतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविणेत आली.
मोहिमेमध्ये स्थानिक नगरसेविका , परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरूण मंडळे तसेच कोमनपा मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर व आरोग्य विभागाकडील एकूण ५० कर्मचारी यांनी सहभाग घेवून संपूर्ण पंचगंगा घाटाची स्वच्छता केली असून ३ डंपर कचरा व गाळ उठाव करणेत आला आहे. तसेच संपूर्ण परिसरामध्ये कीटकनाशके तसेच मनपा टँकरव्दारे पाणी फवारणी करण्यात आली आहे.