दयानंद लिपारे, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांची भाजप प्रवेशाची ‘साखर पेरणी’ सुरू झाली आहे. महाडिक यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. महाडिक यांनी जरी आपल्या साखर कारखान्याच्या कामासाठी आपण ही भेट घेतली असल्याचे सांगितले, तरी या भेटीमागे भाजप प्रवेशाची ‘साखर पेरणी’ असल्याचे बोलले जात आहे.

महाडिक यांना विधानसभा वा विधानपरिषदेत त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्याशी लढत देऊ न पराभवाचे उट्टे काढायचे असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनीही राष्ट्रवादी सोडल्यास कोल्हापुरात अगोदरच निष्प्रभ झालेल्या राष्ट्रवादीला आणखी एक मोठा झटका बसण्याची चिन्हे आहेत. दरम्यान महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्याचे मान्य केले. मात्र या भेटीत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याच्या आर्थिक मदतीवर चर्चा झाल्याचे सांगितले.

देशातील आणि राज्यातील लोकसभा निवडणुकीचे निकाल विरोधकांना धक्का देणारा आहे. निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यातील भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील बडय़ा नेत्यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे बदलते राजकीय वारे पाहून विरोधकांमधील अनेक नेत्यांनाही आता भाजप किंवा शिवसेनेचाच आश्रय वाटू लागल्याने त्यांची पक्षांतरासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

महाडिक कुटुंबाची भाजपाशी सलगी

महाडिक कुटुंबीयांना भाजप नवा नाही. धनंजय महाडिक यांचे चुलते महादेवराव महाडिक हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सल्लय़ाने काम करतात. त्यांचे पुत्र अमल हे भाजपचे आमदार आहेत, तर त्यांच्या सुनबाई शौमिका या भाजपच्या जिल्ह्यातील भाजपच्या पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. खुद्द, धनंजय महाडिक यांचे चंद्रकांत पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. या पाश्र्वभूमीवर महाडिकांची ही वाटचाल उघड गुपीत आहे.

पुन्हा महाडिक-पाटील संघर्ष

महाडिक यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामागे लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पाश्र्वभूमी असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे महाडिक यांच्या विरोधात काम केले. पाटील यांच्याशिवाय राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांनीही महाडिक यांच्याविरोधात काम केले असून याबाबतचा तपशील त्यांनी जयंत पाटील यांना दिला असल्याचे समजते. या पाश्र्वभूमीवर थेट भाजपमध्ये प्रवेश करत सतेज पाटील यांच्याविरोधात उतरण्याचा इरादा महाडिक यांचा असल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितले जात आहे.