कोल्हापूर-वैभववाडी, हातकणंगले ते इचलकरंजी मार्गास मंजुरी

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, हातकणंगले ते इचलकरंजी असा ८ किलोमीटरचा १६० कोटी खर्चाचा नवीन रेल्वे मार्गही मंजूर झाला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्णाच्या लोहमार्ग विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या कामाचे श्रेय आपलेच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेचे अंदाजपत्रकही सादर करण्यात आले. त्यातील तरतुदींची सविस्तर माहिती प्राप्त झाली असून, त्यामध्ये कोल्हापूर विभागाच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. यंदा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. यामुळे लवकरच प्रत्यक्षात काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हातकणंगले ते इचलकरंजी असा ८ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्गही मंजूर झाला आहे. त्यामुळे वस्त्रनगरी इचलकरंजी रेल्वेच्या नकाशावर आली आहे.

खासदारद्वयींत श्रेयवाद रंगला

कोल्हापूरचा विकासासाठी भरीव तरतूद झाल्याचा आनंद करवीरकरांनी व्यक्त केला आहे. पण या कामाचे श्रेय घेण्यासाठी महाडिक व शेट्टी हे दोन्ही खासदार पुढे आले आहेत. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासाठी माजी रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि विद्यमान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात अडीचशे कोटी रुपयांची प्रत्यक्षात तरतूद झाली असून आपल्या या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयामुळे इचलकरंजीकरांची प्रदीर्घ काळची मागणी मंजूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर शेट्टी यांनी आपल्या ८ वर्षांच्या पाठपुराव्यामुळेच सर्वेक्षणापासून निधी मंजुरीपर्यंतची प्रक्रिया पार पडली असे सांगत इतरांनी श्रेय घेऊ नये, असे ते म्हणाले. सुरेश प्रभूंशी असलेल्या मत्रीपूर्ण संबंधाचा फायदा झाल्याचे त्यांनी शनिवारी सांगितले. राज्यपालपदी डी. वाय. पाटील असताना ते माझ्याकडून या मार्गाला  मंजुरी मिळण्यासाठी पत्र घेऊन जात असत, त्यामुळे त्यांना श्रेयाचे भागीदार म्हणता येईल, असे म्हणत त्यांनी आपला रोख महाडिक यांच्यावर ठेवला.