छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासकीय नीती सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यांच्या प्रशासकीय नीतीचा  वापर करूनच आपण राज्यकारभार करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.
शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीरांगणाकड ते श्रीभूदरगड धारातीर्थ यात्रा मोहिमेचा सांगता समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे मौनी विद्यापीठाच्या मैदानात बुधवारी झाला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला आपल्या नीतीने आणि कर्तृत्वाने शह देऊन स्वराज्य मिळविले. त्यांचा पुतळा गारगोटी येथे उभा करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयासमोर ठेवून तरुणांमध्ये शिस्त आणि राष्ट्रतेज जागृत करण्याचं काम शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. देश, धर्म संस्कृती विषयी अभिमानही निर्माण व्हावा या हेतूने शिवप्रतिष्ठानने हाती घेतलेले काम महत्त्वाचे आहे.
भुदरगड किल्लय़ासाठी ११ कोटीची योजना
राज्यातील सर्व गड किल्लय़ांवर जिवंतपणा निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्रीभुदरगड किल्लय़ाच्या विकासासाठी ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन तो पर्यटन मंत्रालयाला सादर केला आहे. किल्लय़ावरील तलावाच्या सुशोभीकरणासाठी ४४ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गडावरील सर्व रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जातील, असेही ते म्हणाले.
शिवजयंतीचा वाद मिटवावा
संभाजीराव भिडे गुरुजींनी बलात्कार करणाऱ्याना ठार मारण्याची शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय समुद्रात पुतळा उभारण्याऐवजी अफजल खानाचा वध केला त्या प्रतापगडच्या पायथ्याशी उभारण्याची मागणी केली. फेब्रुवारीपर्यंत शिवजयंतीचा वाद मिटवावा अशी मागणी भिडे गुरुजींनी केली. गावागावात तालमींची निर्मिती करुन कुस्तीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनामार्फत विशेष योजना हाती घ्यावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी पुढील वर्षांच्या मोहिमेसाठी दौडीत ध्वज धरण्याचा मान मिळविणारे पंडितराव कट्टीकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी  प्रास्ताविक केले. माजी आमदार बजरंग देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब बेडगे यांनी आभार मानले. आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, संभाजीराव भिडे गुरुजी,माजी आमदार के. पी. पाटील उपस्थित होते.