-दयानंद लिपारे

रूपेरी पडद्यावर शोकात्म भूमिकेमुळे दिलीपकुमार यांची प्रतिमा प्रभावी असली तरी कोल्हापूरकरांना मात्र त्यांचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व, ऋजु स्वभाव प्रत्यक्ष भेटीत अधिक भावला. अभिनय सम्राट दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अशा आठवणींचा पट बुधवारी उलगडला गेला. ‘गोपी’च्या चित्रीकरणासाठी कोल्हापूर, पन्हाळा येथे आल्यानंतर त्यांच्या रसिल्या स्वभावाचे दर्शन अनेकांना घडले होते. मेढे तालमीच्या उद्घाटनासाठी ते आले होते तेव्हा दिवंगत मंत्री श्रीपतराव बोंद्रे, बंधू महिपतराव बोंद्रे यांनी गुळाची ढेप दिल्यावर त्याचा आस्वाद घेऊन कोल्हापुरी गुळाचे तोंड भरून कौतुक केलं होतं. कोल्हापुरातील कुस्ती, मांसाहार, तांबडा पांढरा रस्सा, मोकळे- ढाकळे वातावरण यामुळे आपल्या मातीशी नाते जोडले गेले असल्याचा उल्लेख केला होता.

इचलकरंजीतील शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी विद्यार्थी दशेतील आठवण कथन केली. ते मुंबईतील वीर जिजामाता तंत्रनिकेतन विद्यालयात शिकत होते. मुंबईचे नगरपाल या नात्याने दिलीप कुमार या महाविद्यालयात आले असता स्वागताची जबाबदारी निंबाळकर पार पाडत होते. ‘कार्यक्रम स्थळी जाण्याचा रस्ता अरुंद होता. मोटारीतून उतरून काही अंतर चालत जात असताना त्यांच्याशी झालेला संवाद सदैव स्मरणात राहणारा आहे. चालत सभागृहात झालेला त्यांचा प्रवेश हा उपस्थितांना चकवा देणारा ठरला,’ असे निंबाळकर म्हणाले.

कोल्हापुरात आल्यानंतर दिलीप कुमार यांना भालजी पेंढारकर यांना भेटण्याची ओढ होती. पादत्राणे काढून भालजींच्या कार्यालयात त्यांनी प्रवेश केला. भालजी खुर्चीवर बसले होते. समोरची खुर्ची नाकारून दिलीपजींनी त्यांच्यासमोर भारतीय बैठक मारली. या अर्थाने अभिनय सम्राट हा चित्रमहर्षींच्या चरणी लीन झाला. चित्रसृष्टीतील या दोन महान व्यक्तिमत्त्वात अर्धा तास चर्चा रंगली, असे या प्रसंगाचे साक्षीदार ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे. भेटीवेळी त्यांना दूध देण्यात आले. ‘हे दूध नाही; हा आपला प्रसाद आहे,’ असे भालजींना सांगून त्यांनी ते श्रद्धेने प्राशन केले. भालजींना ‘आपल्या चित्रपट निर्मितीत नोकराची भूमिका मिळाली तरी ते करेन,’ असे म्हणत त्यांनी निरोप घेतला, असे भालजींचे स्वीय साहाय्यक अर्जुन नलवडे यांनी सांगितले.

कोल्हापुरातील एका कार्यक्रमासाठी दिलीप कुमार आले. त्यांच्या सोबत ज्येष्ठ नेते शरद पवार असल्याने काही राजकीय धागा आहे का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर त्यांनी ‘नाही बुवा’ असे म्हणत आपले सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत, असा निर्वाळा दिल्याचे ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांनी सांगितले. इचलकरंजी येथे ‘फाय फाऊंडेशन’च्या पुरस्कार वितरणासाठी एक वर्षी दिलीपकुमार यांना निमंत्रित केले होते. या वेळी त्यांच्या हस्ते प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांना पुरस्कार देण्यात आल्याची आठवण डॉ. एस. पी. मर्दा यांनी सांगितली.

‘खाकी’चे स्वप्न अधुरेच

कोल्हापुरात आल्यानंतर दिलीप कुमार मुस्लीम बोर्डिंगमध्ये नमाज पठणाला येणार होते. उशीर झाल्याने त्यांनी विश्वास्तांना शालिनी पॅलेसमध्ये बोलावून घेऊन तेथेच नमाज अदा केली, असे बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर म्हणाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे थोरले बंधू निवृत्त पोलीस आयुक्त एस. एम. मुश्रीफ हे दिलीपकुमार यांचे चाहते. त्यांच्या कन्येच्या विवाहाला आवर्जून उपस्थिती लावल्यावर ‘आपले पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते’ असे नमूद करून ते स्वप्न अपुरे राहिल्याची खंत व्यक्त केली होती.