कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये करोनाचा संसर्ग काही भागांमध्ये वाढू लागल्याने कडक उपाययोजना केल्या जात आहेत. अंशत: टाळेबंदी असलेल्या या भागात पुन्हा एकदा टाळेबंदी लागू झाली आहे. करोना प्रतिबंधक उपाय योजनांचा चांगला परिणाम घडेल असे प्रशासनाला वाटत आहे. तथापि, त्यातील अटींमुळे उद्योजकीय विश्व चिंतेत सापडले आहे. निर्यातभिमुख, संरक्षण, कृषीविषयक वस्तूंचे उत्पादने बंद करणे भाग पडल्याने त्यांच्यासमोर वेगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील करोना  रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवडय़ात पुन्हा वाढत आहे. करोना रुग्णांची एक हजाराच्या पलीकडे गेली आहे. तर मृत व्यक्तींचा आकडा या आठवडय़ात झपाटय़ाने वाढला असून तो १२ पर्यंत पोहोचला आहे. रुग्णसंख्या वाढलेल्या गडहिंग्लज, शिरोळ, जयसिंगपूर या नगरपालिका क्षेत्रांत स्थानिक पातळीवर टाळेबंदी वाढवली गेली.

जनभावनेमुळे पुन्हा संचारबंदी

करोनाचा संसर्ग वाढणाऱ्या ठिकाणी स्थानिक सनियंत्रण समितीच्याद्वारे संचारबंदीचे कडक नियम अमलात आणले जात आहेत. यामुळे लोकांचा संपर्क येणार नाही आणि करोनाची साखळी तुटेल, असा यामागे प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या प्रतिबंधित उपाययोजना या नागरिकांच्या मागणीनुसार केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. करोनाचे रुग्ण अल्पकाळात मोठय़ा प्रमाणात वाढल्याने प्रशासनाला याच्या दुष्परिणामांची भान आहे की नाही? आणखी किती लोकांचे प्राण जाण्याची प्रशासन वाट पाहणार आहे, अशा पद्धतीच्या टोकदार टीका होऊ लागल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय – पोलीस अधिकारी यांच्या बैठका होऊन पुन्हा तीव्र संचारबंदीचा निर्णय घेतला गेला आहे.

उद्योग संकटात

निर्यातभिमुख उत्पादने, संरक्षण क्षेत्रामध्ये भारतीय सैन्यासाठी शस्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना लागणारे सुटे भाग, कृषी क्षेत्रांमध्ये विविध अवजारे, ट्रॅक्टर, यांचे निर्मितीस लागणारे सुटे भाग तसेच कोविड रुग्णालयांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा या टाळेबंदीमुळे ठप्प झाला आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.  उद्योजक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली उत्कर्ष उद्योजक संस्था, इचलकरंजी इंजिनीअरिंग, पार्वती इंडस्ट्रियल असोसिएशन, लक्ष्मी इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या अध्यक्षांनी  उद्योजकांचे होणारे नुकसान आणि भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींची कल्पना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे झालेल्या बैठकीत दिली. गाव पातळीवरील सक्तीच्या टाळेबंदीला सर्व औद्योगिक संघटनांचा तीव्र विरोध असल्याचे उद्योजक सुहास देशपांडे, शीतल केटकाळे,गणेश भांबे, संजय चौगुले, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी लक्षात आणून दिले. याप्रकरणी व्यक्तिश: लक्ष देऊन मार्ग काढू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे उद्योजकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, वस्त्रोद्योगांच्या बैठकीत प्रमुख सूत व्यापारी अरुणकुमार गोयंका, कापड व्यापारी निकुंज बगडिया, प्रोसेस चालक गिरिराज मोहता यांनीही उद्योगाची घडी बसत असताना त्यात व्यत्यय आल्यास अनेक अडचणी निर्माण होतील, अशी भूमिका मांडली. निर्यात बाजारपेठ चांगली असताना ती संधी गमावू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर, ‘अत्याधुनिक शटललेस मागाचे कारखानदार उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत’, असे संघटनेचे अध्यक्ष राजगोंड पाटील यांनी सांगितले.

उद्योजकांसमोर प्रश्न

औद्योगिक पातळीवर आघाडीवर असलेल्या इचलकरंजी व शिरोळ तालुक्यातील काही गावांमध्ये आता संचारबंदी लागू केली आहे. या दोन तालुक्यांमध्ये अर्धा डझन सहकारी औद्योगिक संस्था आहेत. अचानक लागू केलेल्या टाळेबंदीमुळे इचलकरंजी परिसरातील इंजिनिअरिंग उद्योजकांसमोर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत.