पूररेषेतील बांधकामांची चौकशी होणार

जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना, आपत्ती उद्भवल्यास तत्काळ मदतीची उपाययोजना करावी. स्थलांतरीत कुटुंबांची सर्वोतोपरी काळजी घेतली जावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केल्या. ऑगस्टमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात पाऊस होऊ शकतो, त्यामुळे गेल्या चार दिवसांच्या अनुभवांच्या आधारे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या बठकीत दिल्या. नाले बुजवून त्याठिकाणी झालेल्या बांधकामांमुळे पाणी साचून राहते त्यामुळे पूररेषेच्या आत झालेल्या बांधकामांच्या चौकशीला गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात गेली ३-४ दिवस पूरस्थिती उद्भवली असली तरी पालकमंत्री राजधानी मुंबईत महसूल मंत्रिपदाची जबाबदारी पाहत होते. आज शहरात दाखल झाल्यावर त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बठक घेऊन पुराच्या नुकसानीचा आढावा बठक घेतली.  जिल्हा परिषदेकडे ४२ बोटी उपलब्ध आहेत, पंरतु पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट्स उपलब्ध नाहीत, यासाठी आवश्यक लाईफ जॅकेट्सची यादी व अंदाजित खर्च यासह प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यात नसíगक आपत्तीमुळे दोघांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांची मदत तत्काळ देण्यात येईल असे सांगून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. एनडीआरएफ च्या पथकाला जिल्ह्यात १२ जुल रोजी पाचारण करण्यात आले असून ४० जवान, २ अधिकारी व एक डेप्युटी कमांडंट ६ बोटींसह सज्ज असून शहरात व जिल्ह्यात एनडीआरएफ या संस्थेची दोन पथके कार्यरत आहेत. जीवन ज्योती संस्था आणि व्हाईट आर्मी यांचे जवानही कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या मदत व बचाव कार्याबद्दल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यातील भूस्खलन यादी तयार करण्यात आली असून यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी आणि गडिहग्लज या तालुक्यांमधील प्रत्येकी १ तर राधानगरी तालुक्यातील ९ आणि भुदरगड तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. यामध्ये ५२३१ लोक राहत असून येत्या काळात धोका उद्भवल्यास हानी होऊ नये यासाठी या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार कारावा व त्यासाठी स्वतंत्र  बठक लावावी, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाची पाठ थोपटली  

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या काळात अतिशय चांगले नियोजन केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र शासन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालते त्यामुळे आपत्तीग्रस्तांना मदत करताना कोणतीही कसूर ठेवू नका, अशी सूचना केली.