दयानंद लिपारे

राज्याच्या राजकीय परिस्थितीचा कानोसा घेणारी विधान परिषदेचे निवडणूक संपली असली तरी राजकीय हालचालींना नव्याने गती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात महाविकास आघाडीने दोन्ही मतदारसंघांत विजयाने आनंदाचे वातावरण असले तरी आणखी गोळाबेरीज करण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपने आवाडे यांच्या हाती ‘कमळ’ देऊन पक्षाचे मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली आरंभल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांतील बडे नेते सक्रिय झाले आहेत. आगामी महत्त्वाच्या निवडणुका पाहता बेरजेचे राजकारणातून व्यूहरचना केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणामध्ये गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून लक्षणीय फरक पडला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व दोन्ही जागा युतीत शिवसेनेने जिंकल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही. शून्यावर असलेल्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या आता सहा झाली असून काँग्रेसला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. विधान परिषदेची निवडणूक हे त्याचे द्योतक म्हणून पाहिले जाते.

काँग्रेस प्रभारींनी प्रकाश आवाडे यांची भेट घेतल्याने चर्चा

पदवीधर प्रचारावेळी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी अरुण लाड यांच्या प्रचाराच्या साहित्यामध्ये प्रकाश आवाडे यांचे छायाचित्र असल्याचा उल्लेख करीत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांना आवाडे यांना काँग्रेसमध्ये प्रवेश द्यावा, असे भर सभेत विधान केले होते. पदवीधरची निवडणूक संपल्यानंतर लगेचच काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह सतेज पाटील, विश्वजीत कदम या मंत्र्यांसह बडय़ा नेत्यांनी सोमवारी एका स्नेहभोजनाच्या निमित्ताने माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा केली. एच. के. पाटील व आवाडे यांची गेली अनेक वर्षे जवळीक आहे.

पाटील यांच्या माध्यमातून आवाडे यांच्या औद्योगिक प्रकल्पाला अर्थसाह्य़ उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधातून आवाडे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी व्हावी अशी काँग्रेसजनांची भावना आहे. पाटील यांनी राजकीय कारणासाठी ही भेट नसल्याचे पत्रकारांना सांगितले आहे. मात्र राजकीय वर्तुळात आवाडे स्वगृही परत येतील, असे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी आवाडे यांचे राजकारण ढवळून निघाले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद मिळूनही पक्ष सोडल्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुक अपक्ष लढताना ५० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्यापासून त्यांची राजकीय भूमिका अनिश्चित आहे. ते आमदार झाल्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी भेट घेऊन शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांनी शिवबंधन बांधले असते तर पुन्हा मंत्रिपद मिळाले असते अशी चर्चाही तेव्हा रंगली होती. अलीकडे आवडे यांचे चंद्रकांत पाटील यांच्याशी ही सख्य जडले आहे. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येईल असा अंदाज बांधून आवाडे यांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला. आवाडे यांच्या औद्योगिक प्रकल्पाला केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणे हेही भाजपशी जवळीक साधण्याचे कारण असले तरी निधीबाबत भाजप दिरंगाईची भूमिका घेत आहे. विधान परिषद निवडणुकीत राज्यात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर बेरजेचे राजकारण सुरू केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ात भाजप बिकट स्थितीत आहे. एकही आमदार नाही, जिल्हा परिषद ताब्यातून गेली आहे. अशा स्थितीत नव्या वर्षांत महापालिका, नगरपालिका, सहकारी संस्था यांच्या निवडणुकीला सामोरे जाताना सक्षम नेतृत्वाची गरज त्यांना भासत आहे. महाडिक अपेक्षेइतके सक्रिय नसल्याचा पक्षात सूर आहे. आमदार विनय कोरे यांना भाजपपेक्षा ‘जनसुराज्य’चे राजकारण अधिक प्यारे आहे. अशा वेळी आवाडेसारखे सक्षम नेतृत्व भाजपचे जिल्ह्य़ाचे राजकारण व्यवस्थित हाताळू शकेल, असा मतप्रवाह आहे.

गेल्या दोन दिवसांत आवाडे जिल्ह्य़ाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. सर्वच क्षेत्रांत प्रभावी ठसा असलेले आवाडे नेमकी कोणती भूमिका घेणार हे लक्षवेधी बनले आहे. आमदार आवाडे यांना पत्रकारांनी वारंवार विचारणा करूनही मौन सोडलेले नाही. यानिमित्ताने जिल्ह्य़ात सर्व पक्षांनी आगामी राजकीय सामना लक्षात घेऊन बेरजेच्या राजकारणाला रंग भरला आहे.