गैरव्यवहाराच्या आरोपावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) बुधवारी झालेल्या वार्षकि सर्वसाधारण सभेत गैरव्यवहाराच्या आरोपांवरून जोरदार गोंधळ उडाला. विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत समृद्ध गोकुळ संघाची वाटचाल महानंद दूध संघासारखी बिकट व्हायची नसेल, तर गोकुळचा कारभार पारदर्शक ठेवण्याची मागणी केली. त्यांना उत्तर देण्याऐवजी सभाध्यक्ष विश्वास पाटील यांनी पळ काढला. यानंतर विरोधकांनी समांतर सभा घेत संस्थेच्या भ्रष्ट कारभारावर तोफ डागली.

‘गोकुळ’च्या आजच्या सभेकडे अवघ्या जिलचे लक्ष लागले होते. सतेज पाटील आणि माजी आमदार, गोकुळचे सर्वेसर्वा महादेवराव महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला होता. याचाच प्रत्यय आजच्या सभेवेळी आला. सभाध्यक्ष विश्वास पाटील यांनी संघाच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा घेतला. विषयपत्रिकेचे वाचन सुरू झाल्यावर लगेचच सभास्थानी वादाने उचल खाल्ली.

परराज्यातून दूध आणल्यामुळे २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आक्षेप लेखापरीक्षकांनी उपस्थित केला असल्याकडे लक्ष वेधून विरोधकांनी याची जबाबदारी कोणाची, असा सवाल उपस्थित केला. संचालकांच्या वाहनावर २ कोटीची होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी सभासदांनी केली. बाजारात १२ हजार रुपयांना चॉप कटर मिळत असताना ते १८ हजार रुपयांना खरेदी करून संघाचे आíथक नुकसान केल्याची जबाबदारी कोणाची, असाही प्रश्न करण्यात आला. एका पाठोपाठ एक प्रश्नांचा मारा होत राहिल्याने संचालक मंडळात अस्वस्थता पसरली.

समन्वय साधण्यासाठी संचालक अरुण नरके बोलायला उभे राहिले. त्यांनी गोकुळसमोरील आव्हाने पाहता त्यात गोकुळचा डोलारा कोसळण्याची भीती व्यक्त करून राजकीय वादातून संघाला संपवू नका, असा सल्ला सत्ताधारी व विरोधकांना दिला. त्यावर सतेज पाटील यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, आम्हीही गोकुळ वाचवण्यासाठी पुढे येऊ, असे स्पष्ट केले.

मात्र सत्ताधारी काही उत्तर देण्याच्या मानसिकतेत नव्हते. काही महाडिक समर्थकांनी सतेज पाटील यांच्याकडे पाहात आरोप करण्यास सुरुवात केली. यातून सभेत एकच गोंधळ उडाला. कोण काय बोलतंय हेच कळत नव्हते. या वादाचा फायदा उठवत संचालक मंडळाने ‘वंदे मातरम्’ सुरू केले आणि सभा गुंडाळली. तर विरोधकांनी गोकुळ बचावच्या घोषणा दिल्या.

सभाध्यक्ष पाटील यांनी सभा सुरळीत पार पडल्याचा आणि उपस्थित प्रश्नांना योग्य उत्तर दिल्याचे पत्रकारांना सांगितले, तर सतेज पाटील यांनी गोकुळच्या गरकारभाराविरुद्धची लढाई सुरू राहणार असल्याचे समांतर सभेत सांगितले.