सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १९ जागांकरिता ८४ उमेदवारांनी १२५ अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह माढय़ाचे संजय िशदे, मोहोळचे राजन पाटील, मंगळवेढय़ाचे बबन अवताडे आदी चौघा जणांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख हेदेखील निवडणुकीत उतरले आहेत.
दरम्यान, पंढरपूरचे सहकार नेते सुधाकर परिचारक व त्यांचे पुतणे तथा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांचे दोनच अर्ज पंढरपूर संस्था गटातून आल्यामुळे त्यांच्यापकी एकाची बिनविरोध निवड होणार हेदेखील स्पष्ट झाले आहे. सुधाकर परिचारक हे अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. ते यापुढेही बँकेत कायम राहणार की आपले उत्तराधिकारी म्हणून पुतणे प्रशांत परिचारक यांना संधी मिळवून देणार, हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होईल.
विविध कार्यकारी संस्था गटातून प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे ११ जागा आहेत. यातून बार्शी, उत्तर सोलापूर, माढा व मंगळवेढा या चार जागा अविरोध होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असताना खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरसमध्ये एका जागेसाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. यात खासदार मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांच्या काही विरोधकांनी उमेदवारी आणली आहे. अक्कलकोटमध्ये विद्यमान ज्येष्ठ संचालक तथा भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर करमाळ्यातून जयवंत जगताप, रश्मी बागल व जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचे अर्ज आहेत. सांगोला येथून शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांचे पुत्र असलेले विद्यमान संचालक चंद्रकांत देशमुख यांच्यासह वसंत जाधव, शोभा संजय देशमुख (सोनंद) यांनी अर्ज दाखल केले आहेत. दक्षिण सोलापुरातून विद्यमान संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह राजशेखर शिवदारे, अप्पासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
महिलांच्या दोन जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज आले. यात विद्यमान संचालिका रश्मी बागल व सुनंदा बाबर (सांगोला) यांच्यासह इंदुमती अलगोंड (द.सोलापूर), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी जवळीक असणारे विद्या लोलगे (सोलापूर), भाजपच्या नगरसेविका शोभा बनशेट्टी आदींचा त्यात समावेश आहे.
बँक, पतसंस्था गटातून सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनीही अर्ज दाखल केला आहे. याशिवाय माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव देशमुख व त्यांचे पुत्र रणजितसिंह िशदे यांच्यासह सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, माजी महापौर मनोहर सपाटे यांचे अर्ज आले आहेत. तर कृषी पणन गटातून बँकेचे विद्यमान संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, समाधान अवताडे आदी सात उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. इतर शेती व व्यक्तिगत सभासद गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, आमदार दीपक साळुंखे, रणजितसिंह िशदे (माढा), अमरजित िशदे, देवानंद गुंड आदींनी अर्ज दाखल केले आहेत.