जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण शुक्रवारी जाहीर झाले असून कोल्हापूर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने मिनी मंत्रालयात सदस्य म्हणून जाण्यासाठी आतापासूनच इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधण्याची तयारी चालवली असून त्यांच्या उत्साही वातावरण दिसू लागले आहे. अध्यक्षपदाचा लाल दिवा खुणावू लागल्याने निवडणुकाही वाजतगाजत होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील २६ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज होणार असल्याने अनेकांचे डोळे मुंबई कडे लागले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्याही अध्यक्ष आरक्षणाकडे अवघ्या जिल्ह्यचे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापूर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी जाहीर झाल्याने अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. राज्य शासनाच्या बहुतांशी योजना या जिल्हा परिषद मार्फत राबवल्या जातात. त्यामुळे या मिनी मंत्रालयात सदस्य म्हणून जाण्यासाठी आत्तापासूनच अनेकांनी कंबर कसली आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शाहूवाडी विकास आघाडी यांची सत्ता आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी होते. त्यामुळे अध्यक्षपदी काँग्रेसचे संजय मंडलिक यांना संधी मिळाली, तर उपाध्यक्षपदी हदुराव चौगले यांची निवड झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उमेश आपटे यांची अध्यक्षपदी निवड झाली. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला खुले यासाठी आरक्षित झाले. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील यांच्या सर्मथक विमल पाटील यांना अध्यक्षपदावर, तर आमदार सतेज पाटील यांचे सर्मथक शशिकांत खोत यांना उपाध्यक्षपदावर संधी मिळाली. आता नव्याने कोणाची वर्णी लागणार हे नवे सभागृह अस्तित्वात आल्यानतर कळणार आहे.

काँग्रेस, भाजपकडून स्वागत
दरम्यान, अध्यक्षपद सर्वसाधारण होण्याच्या निर्णयाचे स्वागत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले असून यामुळे कोणाही सदस्याला अध्यक्ष होण्याची संधी मिळू शकेल, असे सांगत काँग्रेस पक्षाने सत्ता पुन्हा मिळवण्याची तयारी केल्याचे सांगितले. तर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बदलत्या वातावरणाचा भाजप मित्र पक्षाला फायदा होऊन आम्ही बाजी मारू, असा विश्वास व्यक्त केला.