रुकडीतील डॉक्टर दाम्पत्याचा धक्कादायक खून

रुकडी (ता. हातकणंगले) येथील डॉक्टर दाम्पत्याच्या खून करण्यात तिघा मारेकऱ्यांचा हात असल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. कुलकर्णी दाम्पत्याचे गेल्या एक वर्षांपासूनचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड व बँक खात्याचे तपशील गोळा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.

रुकडी येथील डॉ. उद्धव कुलकर्णी व डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृण खून केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. हल्लेखोरांनी वृद्ध डॉक्टर दाम्पत्याचा अमानुषपणे खून केला होता. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून चार पथकांची नेमणूक करण्यात आली होती. हे हत्याकांड मालमत्ता, व्यावसायिक वाद की अन्य कोणत्या कारणातून झाली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. खुनाच्या घटनेस १५ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही.

पोलिसांनी कुलकर्णी दाम्पत्याचे मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू केले आहे. या दोघांचे वर्षभरातील कॉल डिटेल्स ताब्यात घेतले असून, अधिक वेळा कॉल करण्यात आलेल्या नंबरची यादी वेगळी करण्यात आली आहे. तसेच कुलकर्णी दाम्पत्याच्या बँक खात्यांचे डिटेल्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शेवटचा व्यवहार कुणासोबत झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेच्या तपासासाठी चार पथके नेमण्यात आली होती. घटनेनंतर तपासाला वेग आला होता, मात्र घटनेस १५ दिवस होऊनही याबाबतचे ठोस धागेदोर पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यामुळे या घटनेच्या तपासासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अथवा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी रुकडी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली.