News Flash

मध्ययुगामध्ये स्त्रीवर्गाने दाखवलेले धैर्य विलक्षण – डॉ. अरूणा ढेरे

समाजभूषण पुरूषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘तीन रमाबाई’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. ढेरे बोलत होत्या.

कवयित्री डॉ. अरुणा ढेरे

मध्ययुगामध्ये स्त्रियांना मिळणारी भयानक वागणूक, स्त्रियांचे विधवा होणे, सती प्रथा, बालविवाह आणि स्त्रियांना घरातून मिळणारी पशूपेक्षाही हीन वागणूक या पाश्र्वभूमीवर स्त्रीवर्गाने दाखवलेले धैर्य विलक्षण आहे. असे असले, तरी सती प्रथेची पातिव्रत्याशी सांगड घालून या प्रथेला धर्मशास्त्राने व कर्मकांडाने दिलेले पाठबळ तत्कालीन समाजव्यवस्थेचा कालपट उलगडून दाखवते, असे प्रतिपादन साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे यांनी केले.
समाजभूषण पुरूषोत्तम पांडुरंग तथा बाबुराव गोखले यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘तीन रमाबाई’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. ढेरे बोलत होत्या. कन्या लाहोटी प्रशालेतील या कार्यक्रमाला बाबुराव गोखले स्मारक समितीचे सुभाषराव जोशी, विठ्ठलराव शिखरे, विश्वनाथ के. जोशी, वि. पु. गोखले यांची उपस्थिती होती.
डॉ.अरूणा ढेरे म्हणाल्या, की तीन रमाबाई समजून घेताना, पावणे दोनशे वर्षांचा कालपट समजून घ्यावा लागतो. या कालखंडातील स्त्रियांवर प्रचंड अन्याय झाल्याचे दिसून येते. तसेच मध्ययुगातील स्त्रीविषयक भयानक दृष्टिकोन समोर येतो. हा स्त्रीविषयक दृष्टिकोन अनेक राजवटी वेगाने बदलल्या तरी बदलला नाही. कारण, समाजमन बदलण्यास वेळ जातो.
पहिल्या रमाबाईंच्या जन्मापासून तिसऱ्या रमाबाईंच्या मृत्यूपर्यंतचा काळ एका सत्तेच्या पाडावाचा व दुसऱ्या सत्तेच्या उत्थानाचा होता. त्यातून काळाचा चेहरा दिसून येतो. अवघ्या चोविसाव्या वर्षी सती गेलेल्या रमाबाई पेशवे सात्त्विक, साध्या व सरळ होत्या, त्यांच्याकडे राजकरणी वृत्ती नव्हती. पंडिता रमाबाई काळाच्या पुढे झुकणाऱ्या व स्त्रियांना सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी झटणाऱ्या होत्या. तर, रमाबाई रानडे या सुधारक होत्या. समाजाविषयी कळवळा असणारी स्त्री म्हणजे पंडिता रमाबाई, तर वृत्तीने शालीन व समाजाला न दुखावता सुधारणेकडे नेणारी स्त्री म्हणजे रमाबाई रानडे होत्या. तीन रमाबाई समजावून डॉ. ढेरे यांनी मनुस्मृतीतील दाखले दिले. अधिकार असूनही तो न गाजविणारी रमाबाई पेशवे व स्त्रियांच्या विकासासाठी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी आपआपल्या परीने झटणाऱ्या पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे यांची चरित्रे समाजाला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या दीक्षान्त समारंभप्रसंगी केलेल्या भाषणावर आधारित ‘माझ्या विद्यार्थी मित्रांनो’ हे पुस्तक संपादित केल्याबद्दल प्रा. का. धो. देशपांडे यांचा सत्कार डॉ. अरूणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आला. बाबुराव गोखले स्मारक समितीचे माधव माने, सुवर्णा देशपांडे यांच्यासह नागरिक मोठय़ासंख्येने उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:03 am

Web Title: dr aruna dhere speech on teen ramabai
Next Stories
1 नारळीकर दाम्पत्यास दाभोलकर पुरस्कार
2 स्वतंत्र विदर्भाच्या विधानावरून कोल्हापुरात शिवसेनेची निदर्शने
3 कोल्हापुरात पोलीस मित्रांना प्रशिक्षण
Just Now!
X