देशातील नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने त्याला आपला विरोध आहे. कृषिप्रधान देश उभा करण्यासाठी लढलेल्या महापुरुषांचे परिश्रम भाजपाच्या सत्ताकाळात मातीमोल होत आहे, अशी टीका राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली.

नवीन कृषी कायद्याच्या विरोधात गणेश देवी राज्यभर दौरा सुरू करणार आहेत. त्यानिमिताने ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुरेखा देवी, डॉ. मेघा पानसरे, धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, गजानन कांबळे, मधुकर पाटील, अमोल महापुरे, महादेव शिंगे, पंकज खोत उपस्थित होते. आज सकाळी राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळी अभिवादन करून आपण आपल्या दौऱ्याला सुरवात करत असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनानी पुकारलेल्या बंदला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी, हमाल, अडते, व्यापारी, बाजार समिती प्रशासन यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण कोणत्याही राजकीय हेतूने या दौऱ्यावर निघालेलो नाही. मात्र, याचा सविस्तर अहवाल सरकारला देणार आहोत, असे डॉ. देवी यांनी सांगितले.

जेष्ठ विचारवतांच्या हत्येवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विचारांना दडपून टाकण्याच काम करण्यात येत आहे. ज्याप्रकारे मोदी सरकार नवनवीन कायदे बनवत आहे, हे पाहता लोक विरोधी कायद्याचे राज्य सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.