कामगार नेते गोविंद पानसरे हत्येच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला शनिवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याने पोलिसांनी रात्री दोन वेळा मारहाण केल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकाद्वारे त्याची तपासणी केली असता त्याला मारहाण झाली नसल्याचे रात्री स्पष्ट झाले.

अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय पथकाने अटक केलेला तावडे याला शुक्रवारी रात्री कोल्हापुरात आणले गेले. त्याची वैद्यकीय तपासणी करून आज  सातवे सहदिवाणी न्यायाधीश-कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर दाखल केले. प्रथेप्रमाणे न्यायालयाने नावाची विचारणा केल्यावर तावडे याने पूर्ण नाव सांगितले.  पाठोपाठ त्याने शुक्रवारी रात्री पोलिसांनी दोन वेळा पाठ, पोट, गुडघा आणि डोक्यावर मारहाण केल्याची तक्रार केली.

न्यायालयाने मारहाणीच्या खुणा आहेत का, याची चौकशी त्याच्याकडे केली, तसेच तपास पथकाला तावडे याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. मात्र ही कागदपत्रे उपलब्ध नव्हती. अशातच सरकारी अभियोक्ता व तपासी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडण्यासाठी दहा  मिनिटांचा वेळ मागून घेतल्याने त्यांच्यातील विसंवाद दिसून आला.

यानंतर न्यायालयासमोर तावडे याच्या पोलीस कोठडीवरून युक्तिवाद रंगला. तपास अधिकारी सोहेल शर्मा यांनी तावडे हा मडगाव-गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांच्या संपर्कात होता. त्याने कोल्हापुरात रेकी करण्याबरोबरच शस्त्र मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्या एकाच विचारातून घडल्या आहेत. त्यात तावडे याची भूमिका मोठी असून, त्याचा तपास राज्यात व परराज्यात करावा लागणार असून, त्यासाठी १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली.

तावडे याचे वकील समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलीस तपासात काहीच प्रगती करू शकले नाहीत. तावडे यास पोलीस कोठडी देण्याने काहीही साध्य होणार नसल्याने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी मागणी केली.