दयानंद लिपारे

पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्ह्य़ांत ओल्या दुष्काळाची झळ बसली असताना त्यांच्या मदतीला दुष्काळी भागातील जनता मोठय़ा संख्येने धावून येत आहे. मराठवाडा, खान्देश भागातील काही जिल्ह्य़ांवर सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवलेले असते. या दुष्काळग्रस्तांना त्या त्या वेळी पश्चिम महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात मदत करण्यात आली आहे. आता कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे महापुरात बुडालेले असताना ओल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आपले अश्रू पुसत दुष्काळग्रस्त जनता पुढे आली आहे.

दुष्काळी जनतेने उदात्त भावनेने पाठवलेली अन्नधान्य, पिण्याचे शुद्ध पाणी, कपडे, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची शेकडो वाहने पश्चिम महाराष्ट्रात दाखल होत आहेत. ही मदत पूरबाधितांचा अनुत्साह दूर करण्यास उच्चतम आधार ठरली आहे.   महाराष्ट्रातील काही भागावर वरुणराजाची कृपादृष्टी असते. तर काही भागावर त्याची खप्पामर्जी असते, मराठवाडा यातील महत्त्वाचा प्रदेश. इथल्या दुष्काळाची तीव्रता वाढते तेव्हा साहजिकच त्यांच्या मदतीचे आवाहन करण्यात येते. अशा वेळी मदत करण्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे नेहमीच पुढे असत. दुष्काळग्रस्तांना उभारी देण्याचे कर्तव्य सातत्याने पार पाडणारा याच सातार, सांगली आणि कोल्हापूरमध्ये यंदा महापुराची आपत्ती ओढवली. २००५ सालच्या प्रलयाला मागे टाकणाऱ्या भयप्रद महापुराने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ाला उद्ध्वस्त केले आहे. महापुराच्या विळख्यात ८ ते १० दिवस जलसमाधी मिळाल्याने घरसंसार, शेती- जनावरे, व्यापार- उद्योग यांच्याबरोबरीने वाचनालयासारखी सांस्कृतिक घटकांना जलसमाधी मिळाली आहे.

जलमित्र लातूरकर

लातूरमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली होती तेव्हा मिरजमधून खास रेल्वे सुरू करून तहान भागवली होती. ‘आता महापुराच्या संकटात हा भाग अडकल्याने आम्ही ६० हजार लिटर बाटलीबंद शुद्ध पाणी तसेच अन्य जीवनावश्यक मदत मोठय़ा प्रमाणात केली आहे, असे लातूरचे जल व्यापारी प्रमोद मुंदडा यांनी सांगितले. इतकेच नाही तर, वसंतदादा पाटील यांचे ‘पद्माळे’ हे जन्मगाव पुनर्वसनासाठी दत्तक घेण्याचा निर्णय लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केला आहे. उदगीर येथील डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांच्या अनुयायांनी १० हजार थालीपीठ पूरग्रस्तांना पाठवले आहे. अशाच प्रकारची व्यापक मदत मराठवाडा, खान्देश अशा दुष्काळी जनतेकडून येत असल्याने पूरग्रतांच्या झोळीत मदतीचे दान पडत आहे.

नाते जडले बंधुत्वाचे

सुमारे ७५ टन असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे ७ ट्रकसह चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख आणि स्वयंसेवकांचा चमू कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात दाखल झाला आहे. गृहोपयोगी साहित्य किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पूरग्रस्तांना देऊन काही अंशी आम्ही दिलासा देऊ शकल्याचे जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दुष्काळी भागातील जनतेने इतक्या मोठय़ा प्रमाणात मदत केल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तेथील जनतेचे व मदतकार्याला आलेल्या लोकांचे कौतुक केले.

आता ‘त्यांची’ पैरा फेडण्याची वेळ

’दुष्काळाच्या झळा सोसताना दरवेळी मदतीसाठी धावून येणाऱ्या या सांगली-कोल्हापूरवरच यंदा आपत्ती कोसळल्याने त्यांच्यासाठी आता दुष्काळी भाग स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

’गेल्या चार दिवसांत औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, जळगाव, धुळे आदी जिल्ह्य़ाांतून वाणसामान, कपडे, औषधे आदी मदतीचे साहित्य घेत शेकडो ट्रक सांगली-कोल्हापुरात दाखल झाले आहेत.