जलसंपन्न कोल्हापूर जिल्हय़ात निर्माण झालेल्या पाणीबाणीच्या पार्श्र्वभूमीवर सोमवारी करवीरनगरीत कोरडी व नसíगक रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली. पाण्याची भरमसाट नासाडी करण्याचे टाळून केवळ कपाळाला गंध लावून रंगपंचमी खेळण्यावर नागरिकांनी भर दिला. रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटतानाच सामाजिक संवेदनशीलतेचाही प्रत्यय तरुणाईने घालून दिल्याचे जागोजागी पाहायला मिळाले. पाणी वाचवण्याचा संदेश देणारे व्याख्यान, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमांनाही नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
कोल्हापूर जिल्हय़ात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागले आहे. महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीटंचाईचा हा धोका लक्षात आल्याने निसर्गप्रेमी नागरिकांनी कोरडी होळी आणि तीही नसíगक रंगाद्वारे साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास शहरात अनेक भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गोखले कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाने पाणीटंचाई लक्षात घेऊन कोटीतीर्थ तलावावर स्वच्छता मोहीम राबवली यामध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांसह शेकडो माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. ताराबाई रोडवर रंग लावू नका, कागदावर, हातावर रंग रंगवा असे आवाहन करीत चित्रकला व मेंदी स्पध्रेचे आयोजन केले होते. त्यालाही नागरिक, कलाकार यांनी प्रतिसाद दिला. तर सायंकाळी कसबा बावडा येथे प्रतिमा सतेज पाटील यांनी पाण्याविना रंगपंचमीचे आयोजन केले असता महिलांनी पाणी वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
कंदलगाव येथील तलावामध्ये रंगपंचमी खेळून झाल्यानंतर अंघोळ करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांची बठक होऊन रंगपंचमी दिवशी कोणालाही तलावात अंघोळ करू द्यायचे नाही, गावाला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत खराब होऊ द्यायचा नाही असा निर्धार करून दिवसभर गस्त घातली जात होती. या गावातील शाळेतील मुलांना निसर्गमित्र संस्थेच्या वतीने वनस्पती रंग देऊन टिळा लावून रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर मुलांनी हा उपक्रम आनंदाने साजरा केला. निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांचे जलप्रबोधन केले.