12 December 2017

News Flash

कोल्हापूरचा शाही थाट!

नवरात्रीचा सोहळा करवीरनगरीत दोन महत्त्वपूर्ण  कारणांनी प्रसिद्ध आहे.

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: September 30, 2017 3:00 AM

नवरात्रीचा सोहळा करवीरनगरीत दोन महत्त्वपूर्ण  कारणांनी प्रसिद्ध आहे. त्यातील पहिले करवीरनिवासिनी महालक्ष्मीचा शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरे म्हणजे इथला शाही दसरा. येथील ऐतिहासिक दसरा चौकात साजरा होणाऱ्या या सोहळ्यात करवीरवासीय आत्मीयतेने सहभागी होतात. संपूर्ण छत्रपती घराणे पारंपरिक वेशात सहभागी होऊन सोहळ्याची उंची वाढवतात. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी शमीपूजन केल्यानंतर सोने लुटण्यासाठी एकच गर्दी लोटते. शाही घरण्यातील मंडळींना भेटून सोने देण्यात लोकांना धन्यता वाटते. शाही रुबाब राखत शाही घराणे रयतेशी सुसंवाद राखत असल्याने राजा-रयत यांच्यातील गहिऱ्या नात्याची प्रचीती येत राहते.

साडेतीन पीठात महालक्ष्मीचा समावेश असल्याने घटस्थापनेपासूनच कोल्हापुरात दसरा  सणाचा उत्साह पाहायला मिळते. विजयादशमीचा ऐतिहासिक सोहळा करवीरनगरीत पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात साजरा होतो. देशातील प्रमुख सोहळ्यांपकी एक आणि म्हैसूरपाठोपाठ असलेला शाही दसरा म्हणून याची ओळख आहे.

दसऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व –  डॉ . जयसिंगराव पवार

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर युद्ध मोहिमांना सुरुवात केली. त्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठून ‘प्रस्थान ठेवण्यास’ सुरुवात केली. पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली. नंतर इंग्रजांनी भारतावर कब्जा केल्यावर युद्ध मोहीम ठप्प झाल्या. पण कोल्हापुरात शाही दसरा सुरू राहिला. पूर्वी दर्याच्या वेळी हत्ती, घोडे, उंट, चित्ता यांच्यासह लवाजमा घेऊन भव्य मिरवणूक निघत असे, अशी माहिती इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिली.

असा रंगतो सोहळा

नवरात्रीतील अखेरचा महत्त्वाचा सोहळा म्हणजे विजयादशमी. करवीरचा हा सोहळा देशातील एक प्रमुख सोहळा म्हणून ओळखला जातो. संध्याकाळी पाचच्या दरम्यान श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरुमहाराज पालखी लवाजम्यासह दसरा चौकात वाद्याच्या गजरात पोहोचतात. याच वेळी मेबॅक मोटारीतून न्यू पॅलेसवरून शाही घराण्यातील श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, शहाजीराजे व यशराजे शाही लवाजम्यासह येतात. त्यांचे बॅण्डपथकाने स्वागत करण्यात येते. त्यांच्या हस्ते चौकातील शमीच्या पानांचे पूजन झाले. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौक अनुभवतो. लुटलेले सोने एकमेकांना देत ‘सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांसह सारे करवीरवासीयांकडून सोने स्वीकारत महालक्ष्मी मंदिराकडे जातात. देवीचे दर्शन घेऊन राजवाडय़ात परत जातात.

First Published on September 30, 2017 3:00 am

Web Title: dussehra festival celebration in kolhapur