मंगलमूर्तीच्या आगमनासाठी दोन दिवसांचा अवधी उरला असताना करवीरनगरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरून मतभेदाचे फटाके फुटले. गणेश मूर्ती दान करण्याऐवजी विसर्जित करा,असे आवाहन हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत केले. तर,  गणेश पर्यावरणपूरक करणेसाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून श्री मूर्ती व निर्माल्य विसर्जनामुळे होणारे पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखावे , असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कोल्हापुरात गणेश मूर्ती व निर्माल्य दान करण्याला मोठा प्रतिसाद मिळतो. या कामात सामाजिक संस्था, महापालिका यांचा सहभाग असतो.  दरवर्षीप्रमाणे यंदाही यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रयत्न चालवले आहेत. आज एका पत्रकाद्वारे पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखावे, यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस विभागास ३ ध्वनी मापक यंत्रे उपलब्ध करुन देणेत येणार आहेत.  तसेच मंडप घालणे व वाहतुकीस अडथळा होऊ नये या दृष्टीने यंदा विशेष कृती आराखडा तयार करणेत आला आहे.ध्वनी प्रदूषण कायदा २००० प्रमाणे तसेच शासनाच्या  परिपत्रकाप्रमाणे पर्यावरण निकषांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे महापालिकेच्या पत्रकात म्हटले आहे.

मूर्तिदान धर्मविरोधी

धर्मशास्त्रानुसार विधिवत पूजलेली गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. गणेश मूर्तीमुळे प्रदूषण होत नाही. यामुळे मूर्तीदानाच्या धर्मविरोधी भूमिकेला विरोध करुन नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना भाविकांनी बळी पडू नये, असे आवाहन हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत केले. इचलकरंजीकर म्हणाले, की वर्षभर शहरातील घाण नदीनाल्यात सोडून प्रदूषण करणाऱ्या नगरपालिका गणेशोत्सव आल्यावरच प्रदूषणाच्या बाबतीत सक्रिय होतात. पालिकेसमोर वर्षभर झोपलेले नवपर्यावरणवादीही जागे होतात. गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण असे विचित्र समीकरण मांडून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहे. या हौदात गणेश मूर्तीच्या विसर्जनाचे आवाहन केले जाते. या प्रकाराला हिंदू जनजागृती समितीचा तीव्र विरोध असणार आहे.देव न मानणाऱ्या निधर्मीवाद्यांनी गणेश मूर्तीचे काय करावे हे सांगू नये. हा चुकीचा ट्रेंड दाभोलकरांनी पसरवला आहे. सहिष्णू असणाऱ्या हिंदूच्या भावना दुखवून, त्यांच्या धार्मिक श्रद्धा संपवून विज्ञानवादाचे धडे देणाऱ्या निधर्मीवाद्यांनी यामध्ये हस्तक्षेप करु नये, असे इचलकरंजीकरांनी स्पष्ट केले.