News Flash

कोल्हापूरात पर्यावरणपूरक मूर्तीना मागणी

प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव आता नागरिकांना होऊ लागली

प्रदूषणाच्या दुष्परिणामांची जाणीव आता नागरिकांना होऊ लागली असून यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती पर्यावरण पूरक (इको फ्रेण्डली) श्री मूर्तीकडे कल वाढला आहे. अवघ्या दोन  दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कुंभारवाड्यातील लगबग वाढली असून मूर्तिकाम अंतिम टप्प्यात आले आहे.

वरुणराजाची कृपा झाल्याने गणेशोत्सवाला रंगत येणार आहे. काही सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आणले असून हलत्या मूर्तीचे देखावे सादर करण्याची परंपरा कायम राखली आहे. येथे बनविण्यात येणाऱ्या हलत्या देखाव्यांना राज्यासह गोवा, कर्नाटक, विदर्भ, आंध्र आदी भागातून मोठी मागणी आहे.

शहरात बाहेरगावाहून आणलेल्या गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत . तर , शहरातील  कुंभार गल्ल्यांमध्ये गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरविला जात आहे. मोठ्या मूर्तीपेक्षा घरगुती गणेशमूर्ती करण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. येथील मूर्ती बाहेरगावी जात असल्याने ते काम संपवून आता शहर आणि परिसरात लागणाऱ्या मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. प्लॅस्टर, फायबर आणि रासायनिक रंगांचे दर वाढल्याने यंदा श्री मूर्तीच्या दरात २५ टक्के दरवाढ झाली आहे.

नगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यावर आली असल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना इच्छुकांकडून मदतीचा हात दिला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळातही उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.

यातूनच मोठमोठ्या गणेशमूर्ती स्थापन करण्याकडे मंडळांचा कल वाढला आहे. हलत्या देखाव्याना सुरुवात करुन देणारे श्यामराव कुंभार यांनी, यंदा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्तीला प्राधान्य दिले आहे. या मूर्ती पाच फुटापासून नऊ फूट उंचीच्या असून ती तयार करण्यासाठी कागदाचा लगदा, मेथी पावडर, शाबू-रताळ्याची खळ, खायचा िडक व आयुर्वेदिक रंग यांचा वापर केला आहे. या मूर्ती विसर्जति करताच अवघ्या तीन तासात त्या पाण्यात विरघळतील असे सांगितले. विशेष म्हणजे या मूर्ती तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य माशांना खाद्य म्हणून उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 1:57 am

Web Title: eco friendly ganesh idols in kolhapur
Next Stories
1 पर्यावरणपूरक गणेशोत्सवावरून कोल्हापुरात मतभेद
2 सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने  कार्यालयातील कामे ठप्प
3 पानसरे हत्या: तावडेचा ताबा ‘एसआयटी’कडे
Just Now!
X