आचारसंहिता लागू

‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. ६७ मतदारसंघ असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर असलेले वर्चस्व टिकवणे काँग्रेस पक्षाला आव्हानास्पद बनले आहे, तर बदलत्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पदधिकाऱ्यांची वाहने काढून घेण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धाच्या पारितोषिक वितरण समारंभावर आज आचारसंहितेचा परिणाम जाणवला. कार्यक्रमासाठी आलेल्या काही सदस्यांनी समारंभस्थळाहून काढता पाय घेणे पसंत केले, तर मतदारसंघ गमावलेल्यांना आचारसंहितेचे भय नसल्याचे दिसले.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या. बहुमत व सत्ता गाठण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी घरोबा साधला. याच सत्ताकाळात अनेक उलथापालथी घडवणाऱ्या घटना घडल्या. आता ६७ मतदारसंघांत निवडणुका होऊ घातल्या असून त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम संभवत आहेत.

ग्रामीण भागातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असल्याचा दावा या दोन्ही पक्षाकडून सातत्याने केला जातो. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला जबर हादरा बसला होता. नगरपालिका निवडणुकीत उभय काँग्रेसची पीछेहाट होऊन भाजप-ताराराणी आघाडी तसेच शिवसेनेचे संख्याबळ वाढले. यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्याचा संकल्प बोलून दाखवला आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकिमग चालवले आहे.

बदलत्या परिस्थितीत जिल्हा परिषदेवरील सत्ता टिकवणे हे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील व सत्तेचे मुख्य नियंत्रक सतेज पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान आहे. त्याचबरोबर आपली ताकद आजमावण्याचा संधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांना असणार आहे.

स्पर्धा अध्यक्षपदासाठी

या वेळी जिल्हा परिषदेच्या ६७ मतदारसंघात तर १३४ तालुका पंचायत मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण आहे. यामुळे अनेक इच्छुक या मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष होण्याचे स्वप्न तरळत आहे. उभय काँग्रेसमध्ये या पदाचे अनेक दावेदार अगोदरपासून असल्याने काहींनी भाजपाची वाट धरल्याची चर्चा आहे.