18 July 2019

News Flash

युती – आघाडीधर्माच्या पालनावरच निकाल

कोल्हापूरचा राजकीय आखाडा लोकसभा निवडणुकीच्या मुद्दावरून गेले दीड-दोन वर्षे गाजत आहे.

|| दयानंद लिपारे

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे गतवेळचे पराभूत झालेले उमेदवार संजय मंडलिक यांच्यात सामना होणार हे जवळपास निष्टिद्धr(१५५)त झाले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी आणि भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे  काही समीकरणे बदलणार आहेत. ही बदलती समीकरणे दोन्ही उमेदवारांना जशी फायद्याची ठरणार आहेत तशी ती अडचणीचीही होणार आहेत. उमेदवाराच्या निवडीवरून दोन्हीकडे वाद झाला.

कोल्हापूरचा राजकीय आखाडा लोकसभा निवडणुकीच्या मुद्दावरून गेले दीड-दोन वर्षे गाजत आहे. गटबाजी, पसंती, भूतकाळ-भविष्यकाळातील डावपेच याला महत्त्व मिळत आहे. एकीकडे पहिल्यांदाच संसदेत प्रवेश करूनही संसदीय कामगिरी, विकासकामे, जनसंपर्क याबाबतीत प्रभाव टाकण्यात महाडिक यांचे प्रगती पुस्तक उत्तम ठरले. पण, पक्षीय पातळीवर ते टीकेचे धनी ठरले. त्यामुळे त्यांच्या गुणात्मक कामाची चर्चा कमी झाली आणि टीकात्मक मुद्दय़ांची वावटळ अधिक उडाली. किंबहुना, यावरच जिल्ह्य़ाचे राजकारण फिरू लागले. काहींनी त्याभोवतीच फेर धरला. त्यातूनच महाडिक हे पक्षाचे उमेदवार असू नयेत या मागणीला जोर दिला. त्यामागे महाडिक यांच्या विजयासाठी खस्ता खाल्लेले माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ होते हे दडून राहिले नाही. मुश्रीफ समर्थकांनी एकदा नव्हे तर दोनदा मुंबईतील बैठकीत उमेदवारीला विरोध दर्शवला. मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील या आजी-माजी आमदारांनी महाडिक यांच्या विरोधात रान उठवले. इतके करूनही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापुरातच महाडिक यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. यानंतर मुश्रीफ यांनी पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचा इरादा व्यक्त केला, पण परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने कागल आणि कोल्हापुरात झालेल्या सभेमध्ये मुश्रीफ-महाडिक संघर्षांची ठिणगी उडाली. आता तर महाडिक यांनी कोणाची मदत मिळणार आणि कोणाकडून विरोधाची तिरकी चाल होणार याचा अंदाज घेऊन स्वबळावर निवडून येण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली आहे. त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांच्या भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांचे मेळावे तर महाडिक युवाशक्ती द्वारा युवकांशी संवाद साधला जात आहे.

पहिल्यांदाच संसदेत जाऊनही संसदीय कामगिरी उंचावली, त्यामुळे सलग तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. मतदारसंघाच्य विकासासाठी प्रयत्न केले. नऊ वर्षे बंद असणारी कोल्हापूरची विमानसेवा सुरु करण्यात यश आले . कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठी ३५०० कोटी रुपये मंजूर केले असून १७०० कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद झाली. पर्यायी शिवाजी पूल होण्यासाठी केंद्रीय पुरातत्व खात्याच्या नियमात  बदल करून कामाला गती दिली. कोल्हापुरच्या प्रवेशद्वारावर १८० कोटींचा बास्केट ब्रिज, बीएसएनएलचे टॉवर बदलण्यासाठी १२१ कोटी, रेल्वेच्या विकासकामासाठी ३२ कोटी रुपये मंजूर केले असून बरीच कामे पूर्ण झाली आहेत.     – खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस

खासदार विकासकामे करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्याने सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्यांनी ग्रामीण भागाला वाळीत टाकले आहे. कोल्हापुरातील पंचगंगा पूलही पाच वर्षांत पूर्ण करता आला नाही. मतदाससंघात यापूर्वी कोणीच काही केले नाही, जे झाले ते माझ्यामुळेच अशा वल्गना ते करीत आहेत. फसवल्याची भावना झालेली ग्रामीण जनता त्यांना पुन्हा जवळ करणार नाही.    – संजय मंडलिक, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख

शिवसेनेसमोरही आव्हाने

गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मंडलिक हे ३३ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र असलेले संजय मंडलिक हे शिवसेनेच्या वतीने पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यासाठी संपर्क दौऱ्यांना सुरुवात केली आहे. भाजप-शिवसेनेची युती झाल्याने मंडलिक यांची लक्षणीय प्रमाणात ताकद वाढली आहे. सेनेच्या तीन आमदारांची कुमक त्यांच्यामागे असणार आहे. महाडिकांना उघड-छुपा विरोध करणाऱ्या उभय काँग्रेसच्या नेत्यांची पडद्यमागून मदत होणार हेही दिसू लागले आहे. यामुळे मंडलिक यांची उमेदवारी प्रभावी वाटत असली तरी काही मर्यादा, अडचणी आहेत. चंद्रकांत पाटील, आमदार महाडिक यांची कितपत साथ मिळणार हा वादाचा मुद्दा आहे. विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून चाली रचणारे सेनेचे आमदार किती जोमाने प्रचाराची धुरा वाहणार याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. सेनेच्या माजी आमदाराने तर मंडलिक यांच्या एकूण पात्रतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या मर्यादा ओलांडून पुढे जाताना मंडलिक यांना काटेरी वाट तुडवावी लागणार आहे.

राष्ट्रवादी-भाजपचे समीकरण

राष्ट्रवादीतून महाडिक यांना विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणून त्यांचे भाजपशी, विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी असलेल्या घनिष्ठ नात्याकडे बोट दाखवले जाते. मंत्री पाटील यांनीही महाडिक घराण्याला उपकृत केले आहे. गोकुळ दूध संघाच्या गैरव्यवहाराकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा कल भाजपाकडे झुकला आहे. त्यांचे पुत्र अमल यांना भाजपचे आमदार असून स्नुषा शौमिका यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. पालकमंत्री पाटील यांनी महाडिक यांच्या कृषी महोत्सवात धनंजय महाडिक यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवारास भाजपच्या नेत्यांची पाठराखण हा महाडिक यांच्या पथ्यावर पडणार असली तरी काही वादाचे प्रश्न उभे राहणार आहेत. संजय मंडलिक हे मंत्री पाटील यांच्या पसंतीस पात्र ठरले नसल्याची युतीत कुजबुज आहे. सेनेच्या एका माजी आमदाराच्या व्हायरल झालेल्या ताज्या चित्रफितीने त्यांची आणखी वाच्यता झाली आहे. त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांचे महाडिक प्रेमावर शिवसेनेकडून आक्षेप घेतला जात असून प्रचारकाळात तर तो कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता दिसू लागली आहे. भाजपचे आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे युतीधर्माचे पालन करून शिवसेनेचा प्रचार करणार का, यावरून युतीमध्ये धुळवड होण्याची चिन्हे आहेत. महाडिक उभयतांसमोरही घराचा उमेदवार की युती यावरून होणारी राजकीय कोंडी फोडताना घुसमट होणार हेही ओघाने आलेच.

First Published on February 27, 2019 1:04 am

Web Title: election in kolhapur 3