X

कोल्हापुरातील ऊस कारखानदारीत नेत्यांचा ‘सहकार’!

सत्तेसाठी सोयीचे राजकारण

सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी वर्णी लागल्याची गोडी किती मधुर असते याचा एव्हाना अर्थपूर्ण अनुभव आल्याने भाजपलाही ही गोडी अधिकाधिक अनुभवण्याची चटक लागली असून त्यासाठी राजकीय भूमिका, धोरण, तत्त्व याला मुरड घातली जात आहे. याचा ताजा अनुभव कोल्हापूर जिल्ह्य़ातील बिद्री येथील दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे

एकमेकांना पाण्यात पाहणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांना साखर कारखान्याच्या सत्तेसाठी गळामिठी घातली आहे. मुश्रीफ यांच्याशी असलेले वैर यानिमित्ताने बाजूला सारत खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानाचे नवे दर्शन घडवले आहे. तर तिकडे प्रतिस्पर्धी गोटात शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी घरोबा करून ‘सत्तेसाठी सारे काही माफ’ याचा प्रत्यय घडवला आहे. सत्तेच्या गोडीसाठी चाललेल्या या नव्या आघाडय़ा पाहून अध्र्या लाखाहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी सभासद चक्रावला असून सत्तेवर कोणीही आले तरी ‘सहकारातील स्वाहाकारा’ला कसा आळा बसणार याबद्दल त्याच्या मनात संदेह निर्माण झाला आहे .

देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राचे स्थान अग्रेसर.  या उद्योगावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारंपरिक वर्चस्व राहिले आहे .

भाजपची साखरपेरणी

सहकारी साखर कारखानदारीत सत्तास्थानी पोहचणे यापूर्वी भाजपला सहजशक्य नव्हते. मात्र, गेली तीन वष्रे सहकारातील शक्य त्या ठिकाणी चंचुप्रवेश करण्याची नीती भाजपने अवलंबली आहे. सहकारपंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात तत्कालीन सहकार आणि विद्यमान महसूल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तास्थानाचा पुरेपूर लाभ उठवीत साखर कारखानदारीत भाजपचे कार्यकत्रे संचालकपदाचा खुर्चीवर बसवण्याच्या प्रक्रियेत भाग घेऊन बऱ्याच प्रमाणात यशही मिळवले. गत वर्षी गडिहग्लज येथील अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ-माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या शेतकरी विकास आघाडीने ११ जागांवर विजय मिळवीत कारखान्याची सत्ता कशीबशी राखण्यात यश मिळवले, तर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील-डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने आठ जागांवर विजय प्राप्त करीत साखर कारखानदारीत चंचुप्रवेश केला. तर, मे महिन्यात झालेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणीत महाआघाडीने मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभूत करून सत्ता प्राप्त केली. साखर कारखानदारीत पाटील – मुश्रीफ यांचा सामना एक-एक असा बरोबरीत सुटला पण बिद्रीच्या निवडणुकीत दोघांपकी कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असताना दोघांनी सत्तेसाठी चक्क गळामिठी मारल्याने सभासदांचे डोळे विस्फारले न गेले तर नवल. कारण याला कारण आधीच्या निवडणुकीत दोघांनी उधळलेली मुक्ताफळे.

सत्तेसाठी सोयीचे राजकारण

गडिहग्लज कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर मंत्री पाटील यांनी या कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाने मुश्रीफ यांच्या विजयी वारूला लगाम बसल्याची प्रतिक्रिया नोंदवली होती. याचे कारण याआधी मुश्रीफ यांनी बाजार समिती, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यश मिळवले होते. मुश्रीफ यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी मंत्री पाटील यांनी खोडा घातल्याची खंत मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती. इतक्यावर न थांबता मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न पुढे करीत मंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला होता. त्यानंतर पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याची टूम भरात आली. एकमेकांचे उट्टे काढण्याची एकही संधी न गमावणारे पाटील-मुश्रीफ यांनी बिद्रीच्या निवडणुकीसाठी सत्तासंगत केल्याने त्याची अवघ्या जिल्हय़ात चर्चा आहे. किमान काही संचालकपदावर  भाजपच्या कार्यकर्त्यांची सोय लावण्याचे प्रयोजन पाटील यांचे आहे. तर, बिद्रीचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्याकडे सत्तासूत्रे राहावीत यासाठी पाटील यांच्याशी असलेल्या मतभेदांना तिलांजली देत सहकारातील नवा राजकीय दोस्ताना केल्याचा सांगावा दिला आहे. ही आघाडी प्रबळ दिसत असली आणि उद्या कारखान्यावर या आघाडीची सत्ता आली तर सहकारातील स्वाहाकाराचे पुढे काय होणार, यावर मात्र कोणी बोलत नाही. याच वेळी के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, सेनेचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक, काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्यासह काँग्रेसजन आपले वैर विसरून साखरेची गोडी चाखण्यासाठी हातमिळवणी करून बसले आहेत. एकूणच धोरण, तत्त्व याच्यापेक्षा साखर कारखानदारीत ग्रामीण नेतृत्वाला अर्थश्रीमंत करणारे राजकारण अधिक महत्त्व असण्याला  सारे पक्ष महत्त्व देतात हेच यातून स्पष्ट होते.

सहकारातील स्वाहाकारावर प्रहार

साखर कारखानदारीतील ‘माया’ निवडणूक जिंकण्यास साहाय्यभूत ठरते असे लक्षात आल्यावर विरोधकांनी दोन्ही काँग्रेसच्या साखरसम्राटांना लक्ष्य करण्यास सुरू केले. विशेषत: विरोधक म्हणून भाजप प्रबळ होऊ लागल्यावर त्यांच्याकडून सहकारातील स्वाहाकारावर तिखट भाषेत प्रहार करणे सुरु राहिले. त्यामुळे सहकारातील गरकारभारामुळे नाराज झालेला ग्रामीण भागातील मोठा वर्ग भाजपकडे झुकला. ही बाब अधोरेखित सत्तांतरात करावी अशीच होती. तथापि सत्तांतर झाल्यानंतर साखर कारखानदारीत गोडी भाजपलाही खुणावू लागली असून त्यातून आधीच्या भूमिकेला तडा जाताना दिसत आहे.

Outbrain