महावितरण कंपनीचे कोणत्याही परिस्थितीत क्षेत्रीय पातळीवर पाच विभागांत विभाजन करू नये या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी २० जानेवारी रोजी काम बंद करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी आर. एस. बग्रे यांना देण्यात आला.
महावितरणने प्रशासकीय सोयीसाठी विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मंगळवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. िबदू चौक येथून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष आर. एस. कांबळे, डी. के. हंकारे, जे. पी. फाळके, विशाल चव्हाण, विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र वीज वितरण महामंडळाच्या वतीने महावितरणचे पाच कंपन्यांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीकरणऐवजी सर्व १६ झोन मजबूत करून प्रशासकीय विकेंद्रीकरण करण्यात यावे व त्यावर विभागीय कार्यकारी संचालकांचे नियंत्रण ठेवावे अशी मागणी करणारे निवेदन बग्रे यांना देण्यात आले.