राज्याचे मॅचेस्टर अशी ख्याती असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीतील इंजिनीयरिंग उद्योगाची कीर्ती वस्त्रोद्योगाच्या धवल यशाआड बऱ्याच प्रमाणात झाकोळली आहे. देशातील दुचाकी वाहनांच्या काबरेरेटर्सपकी ८० टक्के काबोरेटर्स इचलकरंजीत बनविले जातात आणि येथे उत्पादित झालेले काही सुटेभाग (स्पेअर्स पार्ट) अमेरिकेच्या प्रसिद्ध जीएमटी कंपनीसाठी निर्यात होतात, ही उल्लेखनीय बाब अप्रकाशित राहिली आहे. येथील इंजिनीयरिंग उद्योगातील उपक्रमशीलता, संशोधन, उलाढाल हे मुद्देही फारसे चच्रेत राहिले नसले, तरी उद्योजकांनी मात्र त्यामध्ये चांगलेच प्रभुत्व निर्माण केले आहे.
इचलकरंजी शहराची केवळ चर्चा होते ती ११५ वर्षांची परंपरा असलेल्या वस्त्रोद्योगाची. पण याच शहरात इंजिनीयरिंग उद्योगाने चांगलेच मूळ धरले असून काही उद्योगांनी तर आपल्या उद्यमतेची पताका विदेशातही फडकावली आहे. मात्र त्याचा फारसा बोलबाला झालेला नाही. या सर्व इंजिनिअरींग उद्योगातील आघाडीचा उद्योग म्हणून ‘फाय’ चा उल्लेख करावा लागेल. पंडितराव कुलकर्णी यांचा ‘फाय’ चा पुरस्कार हा देशभरातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. देशात स्वस्त मोटार बनविल्यामुळे टाटाच्या नॅनोची चर्चा झाली असली, तरी शंकरराव कुलकर्णी यांनी १९८० च्या दरम्यान मीरा ही स्वस्तातील मोटार रस्त्यावर आणण्याची किमया करत संशोधनाचा मोठा पल्ला गाठला होता.
जपानच्या केहीन-फाय याच्यात व्यावसायिक करार दोन दशकांपूर्वी झाला त्यातून दुचाकीसाठी काबरेरेटर बनविण्यास सुरुवात झाली. यातूनच ८० टक्के दुचाकीचे काबरेरेटर बनविले जात असून त्याच्या सुट्टय़ा भागांची निर्मिती ३० ते ४० उद्योजक करीत आहेत. बंद पडलेले कोणतेही इंजिन डोके लढवून सुरु करणाऱ्या कुलकर्णी बंधूंनी स्वतचे ‘इमानी’ इंजिन तयार करून ‘कुल्को’ इंजिनिअरींगची इमानी इंजिने देशभरात प्रसिद्ध केली.
येथील अशोक इंजिनीयरिंगच्या श्री. सुतार यांनी स्वत लेथ बनविला होता. यंत्रमागाचे स्पेअर पार्ट नव्हे तर संपूर्ण यंत्रमाग बनविण्यामध्ये बापू कोळी, माने बंधू यांनी नाव कमावले. कांडी मशिन बनू लागली. पुढे संपूर्ण यंत्रमाग बनविणाऱ्या फौंड्रीज शहरात उभारण्यात आल्या. पंडितराव कुलकर्णी व त्यांच्या परिवारातील उद्योजक, साउंड कास्टिंगचे व्ही. एन. देशपांडे, अशोकराव कुलकर्णी, डी. एम. बिरादार, माधव देवधर, शंकरराव व प्रकाश सातपुते, राजू कुडचे, केटकाळे, पाटील या मंडळींनी चांगली प्रगती केली आहे. धनंजय भाटले या उद्योजकांनी इस्पितळासाठी लागणारी मशिनरी बनवून ती अनेक देशात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजी इंजिनीयरिंग उद्योगात १० हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला.