अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पाíनच्कून यांनी सोमवारी येथे केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर नेटवर्क्‍स (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जकि इंटिग्रेशन ऑफ मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटनप्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे होते. टाटा टेक्नॉलॉजिजचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस. डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी टाटा टेक्नॉलॉजिजचे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख म्हणून उपस्थित होते.

मेकॅट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असलेल्या प्रा. मनुकीड यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, आज जगातील कोणत्याही अभियंत्याला अभियांत्रिकीच्या अन्य शाखांचे वावडे असता कामा नये. मेकॅनिकल अभियंत्याने त्याला आवश्यक असलेल्या हार्डवेअरसाठीचा प्रोग्राम स्वत:च तयार केला, तर त्याला हवा तो निकाल मिळू शकतो. यांसारख्या समस्यांवर मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमातून निर्माण झालेल्या मेकॅट्रॉनिक्स या आंतरविद्याशाखेच्या माध्यमातून उपाय शोधता येणे शक्य झाले आहे.

प्रधान यांनी बाऊंड्रीलेस इंजिनिअर या संकल्पनेची जगाला विशेषत: भारताला मोठी गरज असल्याचे सांगितले. अभियांत्रिकीचे भवितव्य बदलांच्या स्वीकारासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सुसंवाद वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुमार रामचंद्रन यांनीही आर्टििफशियल इंटेलिजन्सच्या बळावर गेल्या चारशे वर्षांत झाले नाहीत, इतके गतिमान बदल येत्या तीस ते चाळीस वर्षांत होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी अभियांत्रिकी शाखांचा एकात्मिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे. एस. बागी यांनी प्रास्ताविक केले. ग्यान प्रकल्पाविषयी समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक उदय पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. या वेळी डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. ए. एम. गुरव, विद्याधर कांबळे उपस्थित होते.