सर्वात मोठा सण असलेल्या दीपोत्सव पर्वास सुरुवात झाली असून, करवीरनगरी रंगीबेरंगी प्रकाशात उजळून निघाली आहे. दीपावलीपूर्वीचा रविवार असल्याने दिवसभर बाजारातील ग्राहकांची गर्दी हटत नव्हती. धनत्रयोदशी, नरकचर्तुदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे दीपावलीतील एकेक सण दररोज साजरे करण्यासाठी घरोघरी तयारीही पूर्ण झाली आहे. तर बालवीर सेना किल्ला बनविण्यात गर्क झाली असून त्यांचा सनिक खरेदी करण्याकडे कल आहे.
दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. पाच दिवस चालणा-या उत्सवाचे वेध महिनाभर अगोदरपासूनच लागलेले असतात. फराळ, कपडे, धार्मिक विधी अशा अनेक कामांची घाई झालेली असते. त्यासाठी विविध प्रकारची खरेदी केली जाते. वसुबारस साजरी झाल्यानंतर दिवाळी सुरू होण्यापूर्वी रविवार हा सुटीचा दिवस आज होता. त्यामुळे करवीरनगरीतील सर्व बाजारपेठा आज तुडुंब भरल्या होत्या. गृहोपयोगी वस्तू, कपडे, फळे, फुले अशी विविध प्रकारची खरेदी सहकुटुंब केली जात होती. दीपोत्सवाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यंदा हा सोहळा पाच दिवस रंगणार आहे.
यंदा नरकचर्तुदशी आणि लक्ष्मीपूजन वेगवेगळय़ा दिवशी आहे. तसेच पाडवा आणि भाऊबीज यांचे दिवसही वेगळे आहेत. यामुळे या वर्षी दिवाळी तब्बल पाच दिवसांची असल्याने उत्सवाचा गोडवा वाढणार आहे. त्यानिमित्त घरोघरी दीप उजळले आहे. विद्युत माळांमुळे रोषणाईत भर पडली आहे. वर्षभरातील थकवा दूर सारून आता सारे जणच दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.