कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अन्य रुग्णालयात उपचार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याअंतर्गत राज्य कामगार विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये सोमवारी ५० खाटांच्या अलगीकरण कक्षाचा लोकार्पण कार्यक्रम खासदार संजय मंडलिक यांचे हस्ते पार पडला.

राज्य कामगार विमा योजनेच्या कर्मचाऱ्यांकरीता २२ वर्षांपूर्वी येथे रुग्णालय सुरु झाले होते. दोन दशके बंद असलेले रुग्णालय अलिकडे सुरू झाले असले तरी येथे केवळ बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध होती. मंडलिक यांच्या प्रयत्नाने ४० कोटीचा विस्तृत आराखडा तयार करुन केंद्रीय श्रम मंत्रालयास सादर केला. या कामाची व्याप्ती २-३ वर्षाची असल्याने लाभार्थ्यांना किमान गरजा मिळण्यासाठी अतिरिक्त ७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

आता अचानकपणे कोविडचे संकट उभे राहिल्याने मंडलिक यांनी हे काम टाळेबंदीचे नियम पाळत दोन महिन्यांच्या अल्पावधीत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले. आज या अलगीकरण कक्षाचे लोकार्पण झाले. ५० खाटांचे रुग्णालय उपलब्ध झाल्याने बाहेरून येणाऱ्या नागरिकांकरीता चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे काम, गतीने पूर्ण केल्याबद्दल रुग्णालयाचे समन्वयक, चेंबर ॲाफ कॅामर्सचे संचालक विज्ञान मुंडे यांचा सत्कार खासदार मंडलिक, महापालिकेचे आयुक्त डॅा. मल्लिनाथ कलशेट्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केला.