राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला साखर उद्योगातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गेले होते. मात्र, याचा अर्थ ते राज्य सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहेत असे म्हणणे गैर आहे. सत्तेबाबत सतत संशयित असलेल्या महाविकास आघाडीला झोप लागत नाही. सरकार हातून गेले की काय; या भीतीने ते सारखे दचकून उठतात, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे रविवारी लगावला.

“देवेंद्र फडणवीस त्यांच्या हालचालीवर राज्य सरकारने जणू कॅमेरा लावला आहे. त्यामुळे ते कुठेही गेले तरी त्याचा राजकीय अर्थ लावला जातो. उद्या ते नागपूरला घरी गेले तरी सुनील केदार, यशोमती ठाकूर यांना भेटायला गेले असे सांगितले जाईल. त्यामुळे थोडा जरी इशारा मिळाला तरी महाविकास आघाडीला त्यामध्ये गडबड वाटते,” असेही पाटील यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणात हलगर्जीपणा

राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीने मराठा समाजातील नेत्यांना विचारात घ्यायला हवे. आमच्या सत्ताकाळात न्यायालयाच्या सुनावणीच्या प्रत्येक तारखेआधी प्रतिरूप न्यायालयाचे आयोजन करून प्रत्यक्ष न्यायालयात कसे कामकाज चालेल आणि आपल्याला कोणते मुद्दे मांडावे लागतील याचा सराव करायचो. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीनंतर आम्ही मराठा नेत्यांची बैठक घेऊन त्यांना चर्चेचा तपशील देत होतो. या सरकारकडून असे काहीच होत नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारच्या पाठीशी राहू. मात्र, सरकारचे प्रयत्न असल्याशिवाय यशाचा परमेश्वर दिसणार नाही, असे ते म्हणाले.

भाजपाचे दुधासाठी आंदोलन

भाजपाचे १ ऑगस्ट रोजी दूध दरवाढीसाठी आंदोलन होणार आहे. दूध संघाना प्रतिलिटर दहा रुपये देण्याची मुख्य मागणी असून या आंदोलनात रासप, रयत क्रांती, आरपीआय या संघटनाही सहभागी होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.