दयानंद लिपारे

करोनाचा फैलाव वाढत असताना कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता बदलीवरून कु रघोडीचे राजकारण जिल्ह्य़ातील तीन मंत्र्यांमध्येच सुरू झाले आहे. राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या निष्क्रिय कामकाज पद्धतीवर पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नाराजी होती. त्यातून डॉ. गजभिये यांची बदली करण्यात आली आहे. नवीन अधिष्ठात्याची निवड जिल्ह्य़ातील तीनपैकी कोणत्या मंत्र्याच्या शिफारशीवरून होणार याची चर्चा सुरू झाली. नव्या निवडीनंतर तरी जिल्ह्य़ातील करोना समन्वयातील अनागोंदी थांबणार का हा प्रश्न कायमच आहे.

सहा महिन्यांपूर्वी कोल्हापुरात अधिष्ठातापदी रुजू झालेल्या डॉ. मीनाक्षी गजभिये पहिल्या दिवसापासून वादग्रस्त ठरल्या. नागपूर येथे त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होती. तेव्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाईची प्रक्रियाही सुरू झाली होती. कोल्हापुरात करोनाच्या काळातही त्यांनी दीर्घकालीन रजेवर जाण्याचा प्रयत्न केला होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कामावर हजर होणे भाग पडले होते.

कोल्हापुरात शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील तसेच करोना चाचणी प्रयोगशाळा या तीन विभागांमध्ये कसलाच समन्वय राहिलेला नाही. त्यांच्यातील अंतर्गत कुरापती, कुरघोडी याच्या राजकारणामुळे करोना उपचार केंद्र वादग्रस्त बनले होते.

करोनाचे दाखल होणारे नेमके रुग्ण किती, बरे होणारे रुग्ण किती, मृत्यू पावलेले याविषयी खात्रीलायक माहिती कोणाकडूनही वेळेत प्राप्त होत नव्हती. वेगवेगळे आकडे प्रसिद्ध होत असल्याने कोल्हापुरातील करोना रुग्णसंख्या हा हास्यास्पद विषय बनला आहे. त्याविषयी एकाही मंत्र्याला ना खेद ना खंत अशी दुरवस्था आहे. जिल्ह्य़ात तीन पक्षांचे तीन मंत्री असतानाही वैद्यकीय क्षेत्रातील ही अनागोंदी पाहून नागरिकांतून तसेच समाजमाध्यमांतून त्यावर सातत्याने टीका होत असते.

बदलीला राजकीय किनार

अशातच तीन मंत्र्यांच्या भिन्न दृष्टिकोनामुळे अधिष्ठाता बदलीला राजकीय कंगोरे प्राप्त झाले. गजभिये यांच्या कामाची पद्धत ही तेथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांनाही पसंत नव्हती. त्यातून पालकमंत्री पाटील यांची त्यांच्यावर खप्पा मर्जी झाली. त्यांची जळगाव येथे बदली झाली. त्याजागी धुळ्याचे डॉ. प्रा. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्याचा आदेश निघाला. डॉ. रामानंद यांनी पूर्वी कोल्हापूरमध्ये काम केले होते. पण त्यांची निवड ही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना रुचणारी नव्हती. यातूनच डॉ. रामानंद रुजू होण्यापूर्वीच त्यांना दुरूनच रामराम ठोकला. कोल्हापूरला येण्यासाठी निघालेल्या रामानंद यांचा मार्ग धुळ्यातच थांबला. तर, जळगावमध्ये रुजू करून घेतले नसल्याने डॉ. गजभिये यांनी कोल्हापूरला परतल्यावर पदभार मिळवण्यासाठी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाची माध्यमात जाहिरातबाजी केली. तरीही त्यांच्यावरील खप्पा मर्जी कायम राहिली. अखेर त्यांची बदली झाली असून आता कोल्हापूरला नवीन अधिष्ठाता कोण मिळणार याकडे लक्ष वेधले आहे.

मंत्र्यांच्या मर्जीला महत्त्व

नवा अधिष्ठाता कोणाच्या मर्जीतला निवडला जाणार याचेही छुपे राजकारण रंगले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे काँग्रेसचे असल्याने त्यांचा काँग्रेसच्या बाजूने राहण्याचे संकेत आहेत. वरकरणी तिन्ही मंत्री हे ‘अधिष्ठाता निवड समन्वयाने केली जाईल’ असे सांगत आहे. अंतर्गत पातळीवर काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ व शिवसेनेला पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर अशा प्रत्येकांनी आपल्या सोयीने निवड व्हावी, असे वाटते. दुसरीकडे, अधिष्ठाता निवडीवरून जिल्ह्य़ातील महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी राजकीय शेरेबाजी रंगली आहे. गजभिये यांच्या बदलीवरून माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘करोना संकटकाळात वैद्यकीय अधिष्ठातासारखे महत्त्वाचे पद रिकामे ठेवले जात आहे. यातील कोल्हापुरातील राज्यमंत्र्यांचा दबाव आणि प्रयत्न निषेधार्ह आहे. आपत्ती काळात राजकारण आणू नये असे सांगणाऱ्या सत्ताधारी मंडळींना त्यांच्याकडून सुरू असलेल्या हीन राजकारणाची जाणीव होत नाही का, अशी विचारणा करीत महाडिक यांनी मंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे.