21 October 2019

News Flash

हातकणंगले मतदारसंघात प्रत्येक वेळी नवी समीकरणे

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते.

निवेदिता माने यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवबंधन बांधले

दयानंद लिपारे

पवार, शेट्टी, आवाडे, माने यांच्या राजकीय संबंधाची विस्मयकारक किनार

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणाचा कायमचा शत्रू असे म्हटले जाते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील राजकारणात याचा नव्याने प्रत्यय येत आहे. त्याला निमित्त मिळाले आहे ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजू शेट्टी यांची जवळीक. ती आता इतकी वाढली आहे कि शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण या नव्या समीकरणामुळे दुखावलेल्या माजी खासदार निवेदिता माने यांनी घडय़ाळाचा त्याग करून हाती शिवबंधन बांधले आहे. हीच घटना राजकारणातील जवळीक आणि दुरावा याचे वळणे आणि वळसे कसे असते हे दाखवून देत आहे. या मतदारसंघातील पवार, शेट्टी, माने आणि माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यातील गेल्या दोन दशकाच्या बदलत जाणाऱ्या प्रवाहातून दिसून येते. प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी राजकारण किती रंग बदलत राहते याचे याहून अधिक चांगले उदाहरण नसावे, इतका हा प्रवास रोचक आणि रंजकही आहे.

या राजकारणाची सुरुवात तशी ४० वर्षांपासून. शरद पवार यांच्याशी दिवंगत खासदार बाळासाहेब माने आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे जवळचे संबंध. त्यातही आवाडे हे अधिक निकटचे. पवार यांनी त्यांना भरभरून मदत केली. सोबत असताना आणि दुरावा असतानाही. बाळासाहेब माने यांचे निधन झाल्यावर १९९६ साली लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर त्यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. पण पवार यांनी आवाडे यांच्या बाजूने कौल दिला. राज्याचे नगरविकास आणि उद्योग राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेल्या आवाडे यांनी अपक्ष उमेदवार निवेदिता माने यांचा पराभव केला. पुढच्या निवडणुकीत माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली, पण याही वेळी त्या पराभूत झाल्या. तिसऱ्या निवडणुकीच्यावेळी चित्र बदलले. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आवाडे काँग्रेसमध्ये राहिले तर माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय फायदेशीर ठरला. त्यांनी आवाडे यांचा पराभव करून घरची खासदारकी पुन्हा राखली.

पवार, माने, आवाडे जवळीक

या वेळी पवार आणि आवाडे यांच्यात काही काळ अंतर राहिले, पण पुढे सहकारात पवार हे काँग्रेसमध्ये असलेल्या आवाडे यांना मदत करत राहिले. परिणामी माने यांच्या चौथ्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या धोरणात्मक निर्णयाप्रमाणे आवाडे यांनी त्यांचा प्रचार केला. या वेळी माने यांनी शिवसेनेचे संजय पाटील यांना पराभूत केले. या वेळेपासून माने-आवाडे यांच्यातही काही काळ सौहार्दाचे संबंध राहिले. पुढची लोकसभा निवडणूक कलाटणी देणारी ठरली.

राजू शेट्टी लोकसभेच्या शिवारात

शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य, आमदार असा प्रवास करून राजू शेट्टी हे लोकसभेच्या रिंगणात डाव्यांची मदत घेऊन आले. त्यांनी माने यांची हॅट्ट्रिक चुकवून पहिल्यांदा शिवारातून संसद गाठली. तर गेल्या निवडणुकीत भाजपसोबत गेलेल्या शेट्टी यांच्या विरोधात कोण, असा प्रश्न उभा राहिला तेव्हा पवार यांनी काँग्रेसच्या आवाडे यांची निवड केली. राष्ट्रवादीचा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडून दिला. कोल्हापूर-सांगलीतील तमाम सहकार सम्राट आवाडे यांच्या बाजूने असतानाही शेट्टी यांनी त्यांच्यावर विजय मिळवला. मात्र तेव्हापासून पवार-आवाडे यांचे संबंध आणखी सुधारले. पवार यांनी आवाडे यांच्याकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद सोपवले.

बदललेले समीकरण

शरद पवार यांच्या धोरणांवर राजू शेट्टी यांनी सातत्याने कडाडून टीका केली. साखर कारखानदाराविरोधात त्यांनी आवाज उठवला. राज्यातील उभय काँग्रेसच्या आघाडी सरकार आणि मंत्र्यांविरोधात रान उठवले. अलीकडे हेही चित्र पालटले आहे. सत्तेत राहूनही शेट्टी यांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात तोफ डागण्यास सुरुवात केली. आता तर ते मोदी यांचे कडवे विरोधक झाले आहे. साहजिकच शत्रूचा शत्रू तो मित्र या न्यायाने पवार आणि शेट्टी यांच्यात जवळीक वाढली. टोकाचे विरोधक इतके जवळ आले आहेत की शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे शेट्टी यांना उभय काँग्रेसशी सलगी व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे आणि त्यांचे सुपुत्र, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांचे योगदान राहिले. पवार, शेट्टी, आवाडे असे नवे समीकरण आकाराला येत असताना माने या मात्र राष्ट्रवादीपासून दुरावल्या आहेत. असा हा सहा निवडणुकांचा प्रत्येक वेळी बदलणारा रंग, बदलणारी समीकरणे घेऊन येणारा हा मतदारसंघ आहे.

First Published on December 20, 2018 2:07 am

Web Title: every time the new equations in hatkanangale constituency