सातारा येथील सदरबाजार परिसरात असलेल्या अक्षय ब्लड बँकेच्या पाठीमागे बोर्ड लावण्याच्या कारणावरुन कॉम्प्युटर क्लासमध्ये घुसून एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक महेश जगताप यांच्यासह अन्य एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

विक्रम रसाळ यांची मालकी असलेल्या विक्रम कॉम्प्युटर या क्लासची पंताचा गोट येथेही एक शाखा आहे. मात्र ती जागा कमी पडत असल्याने विक्रम रसाळ यांनी साताऱ्यातीलच सदरबाजार येथील अक्षय ब्लड बँकेच्या पाठीमागे असणाऱ्या आर. एम. क्लेम या बिल्डिंगमध्ये भाडे तत्वावर जागा घेऊन विक्रम कॉम्प्युटरची दुसरी शाखा सुरू केली. या बिल्डिंगच्या समोर एका डॉक्टरचे क्लिनिक असून, संबंधित डॉक्टर आणि विक्रम रसाळ यांच्यामध्ये पार्किंग आणि बोर्ड लावण्याच्या कारणावरून वाद सुरू होते. ही बाब संबंधित डॉक्टरने माजी नगरसेवक महेश जगताप यांच्या कानावर घातली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास महेश जगताप यांनी विक्रम कॉम्प्युटरमध्ये जाऊन विक्रम रसाळ याला दमदाटी करीत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला खाली आणले. त्यानंतर संबंधित डॉक्टरची माफी मागण्यास भाग पाडले. विक्रम रसाळ यांनी माफी मागितली. नंतर रसाळ याला मारहाण करीत यापुढे चुकीचा वागल्यास तुला गायब करीन, अशी धमकी देत पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ त्या परिसराला सील करून घटनेची प्राथमिक माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी संशयित माजी नगरसेवक महेश जगताप याला ताब्यात घेतले असता अन्य एकाचे  नाव समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. पण, त्याचे नाव समजू शकले नाही. दोघांनाही रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू होते.