13 July 2020

News Flash

कोल्हापुरात मटण विक्रेत्यांवर दरवाढीमुळे ग्राहकांचा बहिष्कार

  कोल्हापूरकर मुळातच खवय्या. त्यात मटण हा त्यांच्या जिव्हेचा जिव्हाळ्याचा विषय.

(संग्रहित छायाचित्र)

 

कोल्हापुरात आल्यावर झणझणीत मटणावर आणि तांबडय़ा रश्श्यावर ताव मारण्याचा बेत असेल तर थोडं थांबावे लागणार आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा उपनगरात मटणाचा दर प्रति किलो ६०० रुपये झाल्याने मटणप्रेमींनी रुद्रावतार धारण केला असून मटण खरेदीसाठी तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या पंचगंगा नदीपलीकडील वाट पकडली आहे. चढय़ा दराने मटण विक्री करणाऱ्या विक्रे त्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी मोहीम समाज माध्यमातून चालवली आहे. दुसरीकडे, बावडय़ातील मटण विक्रेत्यांनी कोल्हापूर शहरापेक्षा ४० रुपये किलो स्वस्त दराने विक्री करीत असल्याचा दावा केला आहे. यातून कोल्हापुरात मटण दरवाढीवरून झणझणीत वाद रंगला आहे.

कोल्हापूरकर मुळातच खवय्या. त्यात मटण हा त्यांच्या जिव्हेचा जिव्हाळ्याचा विषय. खास कोल्हापुरी ढंगातील झणझणीत मटण, तांबडा-पांढरा रस्सा ही इथली खासियत. बाहेरून येणारे अभ्यागत, पर्यटक यांची कोल्हापुरात आल्यावर नाष्टय़ाला मिसळ आणि जेवणाला मटणाची पहिली पसंती असते. पण, मटण तर खायचे पण खिशाचाही विचार झाला पाहिजे अशा मानसिकतेत ग्राहक असतात. त्यामुळे कसबा बावडा येथे मटण दराने सहाशेचा आकडा गाठल्यावर मटणप्रेमींची भलतीच गोची झाली. थेट मटण विक्रेत्यांना पाचारण करून बावडेकरांनी बैठकच आयोजित केली.

कसबा बावडय़ातील मटन दरवाढी निषेधात घेतलेल्या सभेत घोलपे व भोपळे या मटण विक्रेत्यांसमोर चरबीसह मटन ४०० रुपये आणि फक्त मटन ४५० रुपये किलो  दराने विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला.

हा ठराव मान्य न करता विक्रेते बैठकीतून निघून गेल्यामुळे वादंग निर्माण झाला. त्यातून आठ दिवस मटण दुकान बंद ठेवायचे आणि त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो मान्य करून दुकान चालू ठेवावे, असा निर्णय मटनप्रेमींनी घेतला. हा निर्णय अमान्य करून विक्रेत्यांनी  दुकान उघडून विक्री केल्यास ‘जे काही पडसाद उमटतील त्याला ते स्वत: जबाबदार राहतील’ असा इशाराही देण्यात आला. इतक्यावर न थांबता नदीपलीकडे असणारम्य़ा गावात स्वस्त मिळणारे मटण खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

बावडय़ात मटण स्वस्तच

या वादाविषयी मटण विक्रेत्यांशी संवाद साधला असता त्यांनी बावडय़ात मटण  स्वस्त असल्याचा दावा केला. ‘ कोल्हापूर शहरात मटणाचा दर  ५६० ते ५८० रुपये किलो आहे. आम्ही बावडय़ात ५४० रुपयाने विक्री करतो. शहरापेक्षा हा दर कमी असताना काही जण समाज माध्यमातून गैरसमज पसरवत आहेत’, अशी माहिती मटण विक्रेते विवेक भोपळे यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली. ते म्हणाले,आमच्या घराण्यातील तीन पिढय़ा गावात मटण विक्री करीत आहेत. कोल्हापूर, बावडय़ात उत्तम प्रतीचे मटण हवे असते. नदीपलीकडे मिळणारे मटण दुय्यम दर्जाचे असल्याने स्वस्त असते. आमची भूमिका समजून न्याय द्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 4:10 am

Web Title: exclusion consumers price rise on kolhapur mutton dealers akp 94
Next Stories
1 पश्चिम महाराष्ट्रात ऊस गळीत हंगाम तापला
2 ऊसदर आंदोलन चिघळले
3 कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन चिघळलं
Just Now!
X