पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्याबाबत कडक उपाययोजना कराव्यात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कान उपटले असतानाही नदीतील प्रदूषण खुलेआम सुरू असल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने याबाबत तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या प्रदूषण विभागाला जाग येऊन त्यांनी जयंती नाल्याजवळ जाऊन पंचनामा केला. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी करवीर प्रांताधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून पंचगंगा नदीत सांडपाणी मिसळणाऱ्या जयंती नाल्यातील साचलेला गाळ दूर करून रुंदीकरण करण्याचे आदेश महापालिका यंत्रणेस दिले.
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने नदी प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या घटनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींना दिले आहे. या यंत्रणाकडून तात्पुरती कारवाई केली जाते. पण नंतर ये रे माझ्या मागल्याप्रमाणे कारवाईकडे डोळेझाक केली जाते.
पंचगंगा नदीमध्ये जयंती नाल्याचे सांडपाणी मिसळत असते. जयंती नाला ओव्हरफ्लो होऊन विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचा प्रकार प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई, सचिव बुऱ्हाण नाईकवडी यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागास निदर्शनास आणून दिला. महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील व डॉ. राजेश औटी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वस्तुस्थितीवर आधारित केलेल्या पंचनाम्यामध्ये अनेक दोष आढळून आले ते पुढीलप्रमाणे. जयंती नाल्याचे सांडपाणी लाकडी बरगे घालून अडविण्यात आले आहेत, आठपकी तीन बरग्यांतून सांडपाणी ओव्हरफ्लो होत आहे, काळसर रंगाचे फेसाळयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळत आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचना करूनही अतिरिक्त पंप व जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली नाही.