25 September 2020

News Flash

मतदारांच्या फोडाफोडीला वेग

विधानपरिषद निवडणूक

विधानपरिषद निवडणुकीची टोकाला गेलेली चुरस लक्षात घेऊन मतदारांच्या फोडाफोडीला आलेला वेग, त्यातून वधारलेला दर, त्याचे रुसवेफुगवे, दोघांकडून खिसा भरणाऱ्या मतदारांवर करडी नजर, अति संशयित मतदारांना मतदानापासून रोखणे, काहींना मतपत्रिकेवर विशिष्ट खुणा करण्यास प्रवृत्त करणे.. अशा अनेक घडामोडींना ऊत आला आहे.
मतदानाला अवघे चोवीस तास उरले असताना दोन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकेक मत लक्ष्य करीत त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी आटापिटा चालू केला आहे. सहलीवर गेलेल्या मतदारांशी संपर्क साधण्यामध्ये मर्यादा असल्या तरी त्यातूनही पळवाटा काढत दुसऱ्या उमेदवाराशी संपर्क साधून दर वाढवून घेतला जात असल्याने दोन्ही उमेदवारांच्या डोकेदुखीत दिवसागणिक भर पडत चालली आहे. मताला आलेले मोल पाहता ‘पाण्यासारखा पसा’ म्हणजे काय असते हे या निवडणुकीतील घडामोडीतून उघडपणे दिसत असून, या घोडेबाजारावर सामान्य नागरिक मात्र तिखट प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील व काँग्रेसचे बंडखोर आमदार महादेवराव महाडिक यांच्यात सरळ सामना होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी उमेदवारांना सहलीवर पाठविले असून, त्यांची पंचतारांकित सोय केली गेली आहे. सहलीला जाण्यापूर्वी मतदारांचा खिसा चांगलाच गरम केला आहे. इतके करूनही बरेचसे मतदार आणखी काही प्राप्त व्हावे या लालसेने पछाडलेले आहेत.
सहलीवर असताना त्यांना संपर्क करण्यामध्ये मर्यादा आणल्या आहेत. उमेदवारांच्या समर्थकाच्या भ्रमणध्वनीवरून संभाषण करावे लागते. हॉटेलमधूनही बाहेर फोन करण्यास मज्जाव केला आहे. मुक्त लोकशाहीच्या गप्पा मारणारे नगरसेवक पॅकेजच्या गुंत्यात इतके अडकले आहेत, की त्यांच्यावर आपल्या स्वातंत्र्याला तिलांजली देऊन नजरकैदेत राहण्याची सक्ती झाली आहे. कडेकोट पहाऱ्यातूनही चाणाक्ष मतदार प्रतिस्पध्र्याशी संपर्क साधून आपला भाव वाढवून घेत आहेत. तर विजयाचा दावा करणारे दोन्ही उमेदवारही संपर्कात येणाऱ्या मतदाराची मागणी नाइलाजाने का असेना पण पूर्ण करण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून फुटीरांची किंमत वाढली असून निष्ठावंतांना मात्र जे मिळाले त्यात समाधान मानत राहण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. फुटीरांचे मोल गगनाला भिडले असून, त्याचा आकडा ऐकून सामान्यांना भोवळ येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सहलीवर गेलेले मतदार आपल्यालाच मतदान देतील याची ठाम शाश्वती उमेदवारांना वाटत नाही. संशयित मतदारांवर करडी नजर ठेवली गेली आहे. त्यांना मतदानापासून रोखून धरण्याचा विचारही पुढे येत आहे. तर काहींना मतपत्रिकेवर विशिष्ट खुणा करण्यास सांगण्यात आले आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाइल नेण्यास मज्जाव केला असला तरी शर्टावर छुपा कॅमेरा लपवून मतदानाचे चित्रीकरण करण्याची सक्ती काहींवर केली जाण्याची शक्यता आहे. अशा विविध मार्गातून मतदारांवर बंधने आणतानाच मतदान निश्चितपणे आपल्यालाच कसे होईल, याची सूक्ष्म व्यूहरचना करण्यामध्ये उमेदवार व त्यांचे समर्थक गुंतले आहेत. इतके सारे करूनही रविवारी होणाऱ्या मतदानावेळी भलता गोंधळ होणार नाही ना, याची धागधूक उमेदवारांना न लागली असेल, तरच नवल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 3:15 am

Web Title: extreme competition in legislature election in kolhapur
टॅग Kolhapur
Next Stories
1 गॅस सिलिंडरच्या स्फोटात कोल्हापूरजवळ ७ जखमी
2 दत्त आणि पैगंबर जयंती कोल्हापुरात उत्साहात
3 टोलमुक्तीने कोल्हापुरात जल्लोष
Just Now!
X