कोल्हापूर : देशभर टाळेबंदी सुरू असताना अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना कामानिमित्त बाहेर जाण्याची मुभा दिली आहे. याचा लाभ उठवत तोतया पत्रकारांपासून ते वेगवेगळ्या अत्यावश्यक क्षेत्रातील बोगस ओळखपत्राचा वापर करून सर्वत्र बिनबोभाटपणे फिरणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. अशा लोकांविरोधात तक्रारी सुरू झाल्याने आता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरू नये, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. यापासून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या क्षेत्राला वगळण्यात आले आहे. मात्र यालाही बगल देणारे काही महाभाग आहेत. माध्यम, वैद्यकीय,कृषी क्षेत्रातील बोगस ओळखपत्र दाखवून शहरात मोकाट फिरणारे अनेकजण दिसत आहेत.

माध्यम क्षेत्रात कधीतरी डोकावणारे किंवा केवळ कागदोपत्री अस्तित्व असणारे लोक शासकीय यंत्रणेला ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवांचा गैरफायदा घेत आहेत. पेट्रोल-डिझेल याचा वापर अत्यावश्यक सेवेसाठी आहे. मात्र येथे माध्यमाचे ओळखपत्र दाखवून इंधन घेणारे महाभाग आहेत. ‘प्रेस’ असे लिहिलेले कार्ड दिसले की पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही काही न बोलता सेवा द्यावी लागते. तसेच, काही स्थानिक स्वराज्य संस्था, बँक, कृषी आदी क्षेत्रात काम करणारे काहीजण कोणाचीही गाडी घेऊन त्यामध्ये इंधन भरून घेत आहेत. त्यामुळे इंधना शिवाय गाडी थांबण्याचे किंबहुना रस्त्यावर वाहन न येण्याच्या शासनाच्या भूमिकेला हरताळ फासला जात आहे.

बोगस लोकांच्या हाती बेडी

निनावी बोगस बनावट ओळखपत्र दाखवून फिरणाऱ्या एका तोतया पत्रकारावर इचलकरंजी पोलिसांनी कारवाई केली आहे. तर गोकुळ शिरगाव पोलिसांना आज एका मोटारीमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ असे स्टिकर चिकटवलेले वाहन आढळले. चालक गजानन पाटील याने वनविभाग महसूल खाते व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी कारकून असून मला जिल्हाधिकारी कार्यालयाने ओळखपत्र दिल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने ओळखपत्र व गाडीवर लावलेले स्टिकर बोगस असून कोठेही शासकीय नोकरीत नसल्याची कबुली दिल्याने रविवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.