आणखी दोघांना अटक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीत उघडकीस आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे पश्चिम बंगाल व्हाया मुंबई असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून या प्रकरणी टोळी प्रमुखासह आणखी दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून २ हजाराच्या आणखी ९२ नोटा जप्त करण्यात आल्याने नकली नोटांची संख्या १२३ झाली असून याचे बाजारी मूल्य २ लाख ६६ हजार आहे. हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती शनिवारी मिळाली. या टोळीने २४ ते २५ लाखांचे नकली चलन बाजारात खपविले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अटकेतील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून सांगली पोलिसांनी सूरज ऊर्फ मनीष मल्ला ठाकुरी (वय ३६, रा. अर्जुनवाडी, घनसोली, नवी मुंबई) व जिलानी आश्पाक शेख (४७, शिव कॉलनी, गजानन मंदिरजवळ, एरोल सेक्टर १, नवी मुंबई) या दोघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

यापूर्वी राज राजकुमार उज्जेनवाल सिंह (२८) प्रेमविष्णू रोगा राफा (२६), नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, कल्याण) या तिघांना अटक केली होती.

अगोदर अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींसोबत मनीष ठाकुरी २३ ऑगस्ट रोजी सांगलीत आला होता. मुख्य बसस्थानकाजवळील एका दुकानातून त्यांनी खाद्यपदार्थ खरेदी केले. यासाठी त्यांनी दोन हजाराची नोट दिली. दुकानात महिला होती. तिला या नोटेविषयी शंका आल्याने तिने संशयितांना, नोट बनावट आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी हा प्रकार उघडकीस आला होता. त्या दिवशी राज सिंह यास पकडले होते. त्याचे साथीदार पळून गेले होते.

अटकेतील राज सिंह, प्रेमविष्णू राफा व नरेंद्र ठाकूर या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीतून जिलानी शेख व मनीष ठाकुरी यांची नावे निष्पन्न झाली. त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी नवी मुंबईला रवाना झाले होते. पोलीस पथकाने या दोघांना पकडल्यानंतर दोघांच्या घराची झडती घेतली असता दोन हजाराच्या आणखी बनावट नोटा सापडल्या. त्या जप्त करून पथक शनिवारी पहाटे सांगलीत दाखल झाले.

यातील जिलानी शेख हा टोळीचा म्होरक्या आहेत. त्याच्या चौकशीतून बनावट नोटांचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक येत्या एक-दोन दिवसात पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.

जिलानी शेख याचे पश्चिम बंगालमधील मालदा हे गाव आहे. तिथे तो बनावट नोटांची छपाई करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. बंगालच्या या टोळीचे बँकेत खाते आहे. या खात्यावर दहा हजार रुपये भरल्यानंतर ही टोळी त्या बदल्यात दोन हजाराच्या बनावट ५० नोटा (एक लाख रुपये) देते. या नोटा घेऊन एक जण रेल्वेने कल्याणमध्ये येतो. त्याच्याकडून शेख नोटा घेऊन त्या साथीदारांच्या माध्यमातून चलनात आणत होता. टोळीच्या खात्यावर आतापर्यंत त्याने १२ लाख रुपये भरले आहेत. यावरून त्याने या बदल्यात २४ ते २५ लाख रुपये बनावट नोटांच्या बदल्यात घेतले असून तेवढे नकली चलन बाजारात खपविले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

अटकेतील प्रेमविष्णू राफा याची स्वतच्या नावावरील तीन बनावट आधार कार्ड, तीन बनावट पॅनकार्ड, विविध बँकाची पाच एटीए कार्ड्स जप्त केली  आहेत. अटक करण्यात आलेल्या जिलानी शेख याच्याविरुद्ध नाशिक जिल्ह्यतील सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यत त्याला दोन वर्षांपूर्वी अटकही झाली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: False notes from sangli are up to west bengal
First published on: 02-09-2018 at 02:49 IST