वाहनांची जाळपोळ, ऊस वाहतूक रोखली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन तीव्र झाले असून कोल्हापुरात काल रात्री ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर परिणाम झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात विशेषत: शिरोळ व हातकणंगले तालुक्यात ऊसदराचे आंदोलन चिघळले आहे. कर्नाटकमधील कारखानदारांनी ऊस दराबाबत ठोस भूमिका घेतली नाही. त्यांच्या या आडमुठय़ा भूमिकेमुळे ऊस आंदोलनास हिंसक वळण लागल्याचे आंदोलक सांगत आहेत. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे कर्नाटकातील अथणी शुगर्सकडे ऊस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पेटवण्यात आला. सहा ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून ऊसवाहतूक रोखली. तसेच, आळते (ता. हातकंणगले) येथे कर्नाटकातील बेडकिहाळ येथील व्यंकटेश्व्रा कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून ऊस वाहतूक रोखली गेली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी घोषित करतील तो दर दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, अशी आक्रमक भूमिका घेऊ न संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.