News Flash

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शासन धोरणावर टीका केली.

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषिपंपाची वीज दरवाढ, वाढते भारनियमन यांच्याविरोधात सोमवारी येथे शेतकऱ्यांचा जोरदार आवाज उमटला. महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचे उग्र दर्शन घडले. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी तर कृषिपंपाच्या वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीबाबत सरकार बहिरे झाले आहे, असा टोला लगावत  सरकारने वेळीच या प्रश्नी लक्ष घालून अन्यायी दरवाढ मागे न घेतल्यास सरकारच्या पोटात धडकी भरेल असे आंदोलन नजीकच्या काळात उभे करू असा इशारा दिला. तसेच वेळप्रसंगी मंत्रालयाला मानवी साखळी करून घेरावा घालण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. ऊर्जामंत्र्यां विरोधात हक्कभंग मांडा, अशी सूचना त्यांनी उपस्थित आमदारांना केली.

सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषिपंपाची वीज दरवाढ रद्द करावी, सर्व कृषिपंपांना वीज मीटर बसवावे, शेतकऱ्यांची चुकीची वीजबिल थकबाकी दाखवून चालू असलेली बदनामी थांबवावी या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्यांचे निवेदन मुख्य अभियंता एम. जी. िशदे व अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी स्वीकारले.

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शासन धोरणावर टीका केली. महाडिक म्हणाले, सरकारने ७२ पशावरून दरवाढ १ रुपये ९७ पशापर्यंत केली आहे. सरकारची धोरणे शेतकऱ्याच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. या धोरणांविरोधात महाराष्ट्रभर एक मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांशी सुसंगत भूमिका घेणे गरजेचे आहे. पण सध्या राज्य शासन शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. याच कारणामुळे सत्ताधारी आमदार असूनही आपण या ठिकाणी सहभागी असल्याचे सांगितले.

शासन दरबारी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. हे राज्य मोगलाईचे आहे काय, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचे सांगून आमदार सुजित मिणचेकर यांनी सरकारवर तोंडसुख घेतले. आमदार चंद्रदीप नरके यांनी उद्योगांवर मोठय़ा प्रमाणात रोजगार अवलंबून असल्याचे कारण सांगून त्यांना २४ तास वीजपुरवठा केला जातो. मग शेतीला वीजपुरवठा करण्यास काय अडचण येते असा सवाल उपस्थित केला. यावेळी वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, माजी आमदार संजय घाटगे, बाबासो पाटील – भुयेकर, आर. जी. तांबे, अरुण अण्णा लाड, विनायकराव पाटील, जे. पी. लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2017 2:29 am

Web Title: farmers agitation mahavitaran kolhapur
Next Stories
1 बगलबच्चांना लगाम घाला!
2 कोल्हापुरात प्रदीर्घ कवितेचा विक्रम
3 भाजपकडून कोल्हापुरात विधानसभेची मोर्चेबांधणी
Just Now!
X