बाजाराबरोबर मन कोसळलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख

‘दीड एकर शेतात ७५ दिवस मेहनत करून उत्तम प्रतीचा ‘फ्लॉवर’ पिकवला. आनंदाने माल घेऊन बाजारात आलो. बाजारापर्यंत ‘फ्लॉवर’चे एक पोते पोहोचवायला १०० रुपये खर्च आला तर त्याच्या विक्रीतून हातात केवळ १२० रुपये पडले. आता या वरच्या २० रुपयातून या पिकासाठी आलेला ७५ हजारांच्या खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची? ..राग आणि दु:ख गिळतच गावी परतलो. उभे पीक नांगरून शेतात गाडून टाकले. शेतात पीक नाही तर आम्हीच आम्हाला गाडून घेत होतो!’..डोळय़ात दाटलेल्या अश्रूंना वाट करून देत शिरोळ तालुक्यातील अनिल खंजिरे आपली व्यथा मांडत होते.

फ्लॉवर, कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर आणि असेच एकामागे एक अनेक पिकांचे दर सध्या कोसळत असून त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी असा बांधाबांधावर आक्रोश करत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यातील शेती ही खरे तर ‘सुजलाम सुफलाम’ अशी. भरघोस उत्पादन देणारी. पण शेतक ऱ्याने अपार मेहनत करत चांगले उत्पादन काढावे आणि बाजारभावाने त्याची नासाडी करावी अशीच काहीशी स्थिती सध्या सर्वच शेतशिवारात दिसत आहे.

तानाजी व्यंकट देशमुख या पदवीधर तरुण शेतकऱ्याने चौकी आंबा-भोसरे (ता. खटाव) येथे एक एकरावर टोमॅटो लावला. खते, औषधे, पाणी या साऱ्याची तजवीज करत आणि कष्ट उपसत चांगले पीक काढले. पहिल्याच तोडय़ातील टोमॅटो मुंबईच्या बाजारपेठेत पाठवले आणि किलोला केवळ २ रुपये दर मिळाला. आलेल्या पैशातून साधी व्यापाऱ्याची दलाली आणि वाहतूक खर्चही सुटला नाही. ‘एक एकरावरील या पिकासाठी लाखभर रुपये खर्च आला. आता हे पैसे तर पाण्यात गेलेच पण कुटुंबातील प्रत्येकाने उपसलेले कष्ट, दिलेला वेळ, तोही मातीत गेला.’ व्यवस्थेवरचा आपला राग व्यक्त करत देशमुख यांनी हे सारे पीक संतापून उपटून टाकले.

मिरज तालुक्यातील खंडेराजुरीचे कुबेर भूपाल चौगुले या शेतक ऱ्याची अशीच दु:खद कहाणी.  बाजारात टोमॅटोला दर मिळत नाही म्हणून त्यांनी तो कोल्हापुरातील शेतीमाल प्रक्रिया कंपनीच्या (पल्प बनवणाऱ्या) दारात नेला. पण त्यांनी बाजारात २ रुपये किलो दर असणाऱ्या या टोमॅटोला ५० पैसे दर देत या वेदनेवर आणखी मीठ चोळले. दु:खी कष्टी झालेल्या चौगुले यांनी हा सारा माल तिथेच सोडून दिला आणि अत्यंत खिन्न मनाने शेतातील उभे पीक जनावरांना खाऊ घातले.

कोथिंबिरीच्या ५०० जुडय़ा घेऊन बाजारात आलेल्या कोल्हापुरातील सुरेश पाटील हे आपला माल कुणीतरी खरेदी करा म्हणून गयावया करत होते. परंतु पडलेल्या दरांमुळे सगळय़ाच शेतक ऱ्यांची ही स्थिती, त्यामुळे त्यांच्याकडे तरी कुणाचे लक्ष जाणार. अखेर या ५०० जुडय़ांचा सौदा ठरला तो केवळ ५० रुपयांना. निराश झालेल्या पाटील यांनी त्या व्यापाऱ्याकडून हे ठरलेले पैसेही न घेता दु:खी अंत:करणाने घरची वाट पकडली.

फ्लॉवर, कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी अशा अनेक पिकांच्या घसरलेल्या दरामुळे जागोजागीचा बळीराजा असे दु:ख गाळत आहे. या पिकांतून कुटुंबासाठी चार पैसे मिळणे तर दूरच पण याच्या उत्पादनासाठी झालेला खर्चही सध्या मिळेनासा झाला आहे. दुष्काळ पडला तर पाण्याअभावी जळणारा शेतकरी यंदा मुबलक पाणी असूनही बाजारभावाअभावी रडत आहे.

अडाणी म्हणून हिणवण्यापेक्षा मार्गदर्शन करावे

राज्यात, प्रदेशात कोणत्या पिकाची किती लागवड झाली आणि याची एकूण मागणी किती राहील याचे नियोजन-अभ्यास शासनाने करत आम्हाला मार्गदर्शन करायला हवे. शेतक ऱ्याला केवळ चांगले पीक तयार करायचे समजते, बाजाराचा अंदाज त्याला कधीच येत नाही. कष्ट करून तयार केलेले पीक गाडून टाकताना त्याला प्रचंड वेदना होत असतात. आम्हाला बाजार नियोजन कळत नाही, पण म्हणून आम्हाला अडाणी हिणवण्यापेक्षा तज्ज्ञांनी मार्ग दाखवावा.   – तानाजी देशमुख, शेतकरी.

पिकांचे नियोजन हवे

यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी अशी भाजीपाल्याची मोठी लागवड  केली आहे. हे सारे पीक एकाचवेळी बाजारात आल्याने दर घसरून त्याचा शेतकऱ्यांना मोठा आíथक फटका बसतो आहे. हे टाळण्यासाठी शेतमाल उत्पादनाचे नियोजन निश्चित केले पाहिजे. काही ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून मूल्यवधत प्रक्रिया उद्योग सुरू केले पाहिजेत.   – खासदार राजू शेट्टी</strong>

किरकोळ बाजारात चढे दर

शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने विकत घेतला जाणारा भाजीपाला शहरात मात्र नफेखोरीने विकला जात आहे. चालू आठवडय़ात कोल्हापूर येथील बाजारातील घाऊक दर आणि अन्य शहरातील त्या मालाची विक्री किंमत पाहिली तर ही तफावत सहज लक्षात येते. कोल्हापुरातील भाजीपाल्याचे दर आणि कंसात अन्य शहरात त्याच मालाचे विक्रीचे भाव पुढीलप्रमाणे – टोमॅटो २ रुपये किलो (१० रुपये), फ्लॉवर २ रुपये प्रति गड्डा (२० रुपये), कोबी २ रुपये प्रती गड्डा (१५ रुपये), कोथिंबिर १० पैसे ते १ रुपया जुडी (१५ रुपये), मेथी १ रुपया जुडी (१० रुपये)