शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोल बडवून झाल्यानंतर आता शिवसेनेने सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर या आंदोलनात शिवसेनेचे आमदार सहभागी झाल्याचे ठळकपणे दिसून आले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

सत्तेतील भागीदार पक्ष असलेल्या शिवसेनेने कर्जमाफीप्रकरणी आंदोलन करण्याची भूमिका घेतली असून त्यासाठी सेना तिसऱ्यांदा रस्त्यावर उतरली. याच मागणीसाठी आज शिवसेनेने मोर्चा काढला. शेतकरी दसऱ्यापर्यंत कर्जमुक्त झालाच पाहिजे अशी मागणी करीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. पण अद्याप या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना भेटला नाही. ही कर्जमाफी योजना अत्यंत गुंतागुंतीची आहे हे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून शिवसेनेची भूमिका मांडली आहे. शासन दरबारी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त होऊन त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी केवळ उद्धव ठाकरे यांनी भाग पाडले आहे. पण शासनाने फक्त कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा लाभ एकाही शेतकऱ्याला मिळाला नाही. त्यामुळे दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घाई मंत्रिमंडळ सहभागाची

यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर तसेच संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव हे तीन जिल्हाप्रमुख सहभागी झाले होते. पण सर्वात उठून दिसत होते ते मंत्रिपदासाठी गुडघ्याला बािशग बांधलेले सर्व सहा आमदार. मंत्रिमंडळ विस्तार खुणावत असल्याने राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील या  सहाही आमदारांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. आमदार आले पण त्यांचे पाठीराखे मात्र अभावाने दिसले. उपस्थिती जमवण्याची जबाबदारी बहुतांशी जिल्हाप्रमुखांनी पार पाडली.